Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा

 महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा


पाटणा : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

नड्डा यांनी बिहारमधील भाजपच्या १६ जिल्हा पक्ष कार्यालयांचे पाटणा येथून उद्घाटन केले. तेव्हा ते बोलत होते. बिहारमधील राजदसह अन्य प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढविताना नड्डा म्हणाले की, बिहार ही लोकशाहीची भूमी आहे. येथे घराणेशाहीविरुद्ध केवळ भाजपच लढू शकते. बिहारमध्ये आम्ही राजदशी लढतो आहोत, तो एका कुटुंबाचा पक्ष आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील कौटुंबीक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचा पक्ष हा एका व्यक्तिचा पक्ष आहे. महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे काँग्रेस बहीण - भावाचा पक्ष बनला आहे.

पाटणा येथे आगमनानंतर झालेल्या भव्य स्वागताचा उल्लेख करून ते म्हणाले की, कालच्या या सोहळ्यावरून भाजपचे सामर्थ्य कसे वाढत आहे, हे लक्षात येते. भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, ज्यांच्याकडे विचार नाहीत ते एकतर संपले किंवा संपतील. आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो. विचार नसलेले लोक संपले. जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप.

आम्ही कार्यालय म्हणतो, ऑफिस नाही. कार्यालय संस्कारांचे केंद्र असते. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना संस्कार शिकवतो. कार्यालयात बसल्याने एकमेकांसोबत काम करण्याचे संस्कार होतात. भाजपचे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी शक्तीचे केंद्र आहे. येथून कोट्यवधी कार्यकर्ते तयार होतील, असे ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.