Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यासाठी लाजीरवाणी घटना; विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

राज्यासाठी लाजीरवाणी घटना;  विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की


मुंबई:- शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे. महाराष्ट्रात एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक मुद्दे महत्त्वाचे असताना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी कती घडणं राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे.

सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते. यावेळी अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.

कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ

दरम्यान, विधीमंडळाच्या पायऱ्यांवरील या धक्कादायक प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल, तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली असे म्हणत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, आम्ही डरपोक नसल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.