Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरहर कुरुंदकर नेहरुंवर लिहितात...

नरहर कुरुंदकर नेहरुंवर लिहितात...


नेहरूंनी प्रयत्नपूर्वक पोलाद वाढविले, सिमेंट वाढविले, धरणे वाढविली, शेतीच्या संशोधनावर भर दिला आणि अन्नधान्याचे उत्पन्न सतत वाढवीत नेले.  ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला भारताची लोकसंख्या स्थूलपणे ३५ कोटींच्या आसपास होती. फाळणीचे सत्य पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही. फाळणीमुळे देशातील २३ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के जमीन आपणापासून वेगळी झाली इतकेच आपण पाहतो. पण देशातील ६० टक्के तेलबीजे, ८० टक्के ताग, ८० टक्के कापूस, १०० टक्के अँटिमनी, गंधक आणि प्रचंड प्रमाणावर खनिजद्रव्ये आपल्याला गमवावी लागली. कालव्याखालील जमीन जी आपण गमावली तिचे प्रमाण ३५ टक्क्यांहून अधिक होते. फाळणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून धक्का बसलेला होता. आधीच ४८ दशलक्ष टन असणारे धान्याचे उत्पादन १९४८ साली ३८ दशलक्ष टनांहून थोडे कमी झाले होते. 

लोकसंख्येच्या वाढीवर मात करणारा अन्न-धान्याचा वेग निर्माण केला नाही, तर या देशात लोकशाहीही टिकू शकत नाही आणि हा देशही टिकू शकत नाही आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, सिलोनने एखादे दिवशी आपला अपमान उद्धटपणे केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही. लोक नेहरूंना मारखाऊ म्हणाले, पडखाऊ म्हणाले. त्यांची राजनीती आत्मघातकी आणि शेळपट असल्याचे अनेकांनी सांगितले. पण लोक जाणिवपूर्वक विसरतात ते हे की, स्वातंत्र्यकाळी भारतात रेशन होते आणि माणशी ६ छटाक दररोज अन्न दिले जात होते. अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर ४९ साली रेशन माणशी ४॥ छटाकावर आणणे आपल्याला भाग पडले होते. पाकिस्तानच्या डरकाळ्या त्यांच्या मागे पंजाबचा गहू आणि कापूस, बंगालचा ताग आणि तांदूळ असल्याच्यानंतर अमेरिकेच्या शस्त्रबळावर सुरू होतात. आमच्याजवळ यापैकी काहीच नव्हते. 

एका उद्ध्वस्त उपाशी , भिकार  देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. नेहरू वारले त्या वेळी धान्योत्पादन पुष्कळच वाढलेले होते. १९६८ सालानंतर आपण १०० दशलक्ष टन धान्य निर्माण करू लागलेलो होतो. लोकसंख्या दुप्पट होण्याच्या पूर्वी धान्योत्पादन दुप्पट झाल्यामुळे आता या देशातील जनतेला पुरेसे धान्य आपण देशात तयार करू शकलो.

नेहरूंच्यापेक्षा शास्त्री धीटपणे वागू शकले आणि शास्त्रींच्यापेक्षाही इंदिरा गांधी अधिक धाडसी पावले टाकू शकल्या. कारण नेहरूंनी सर्वांच्या शिव्या खात १९५० पासून जे घडवीत आणले त्याची फळे दोन दशकांच्यानंतर आज देश उपभोगीत होता. पण हा उपभोग घेताना नेहरूंच्याबाबत मात्र शिवीगाळ आपण टाळू शकलो नाही. शून्यातून उभारणी करणाऱ्या पंतप्रधानांचा काळ शिव्या खात जातो, तो योग नेहरूंचा होता याला इलाज नाही. 

आधुनिकीकरण ही चमत्कारिक बाब असते. आज धरणाची पायाभरणी करावी लागते. म्हणजे १० वर्षांनी धरण पूर्ण होऊन पाण्याचा उपयोग होऊ लागतो, या पाण्यावरील शेतीशी शेतकऱ्यांची तडजोड होण्यात ४-२ वर्षे जावी लागतात. मग वेगाने उत्पादन वाढू लागते. १५ वर्षांनंतर नफा देणारा आणि आरंभीच कोट्यवधींचे भांडवल मागणारा उद्योगधंदा खाजगी भांडवलदार करणे शक्यच नव्हते. आमच्या देशातील भांडवलदार वर्ग हा सर्वच मागासलेल्या देशातील भांडवलदार वर्गाप्रमाणे कच्चा माल बाहेर विकणारा आणि पक्का माल आयात करणारा दलालांचा वर्ग होता. हा वर्ग मूलभूत उत्पादनक्षमता वाढविण्याचे कार्य करूच शकत नव्हता आणि म्हणून शासनाला देशाच्या मूलभूत उभारणीत मध्यवर्ती वाटा उचलणे भाग होते. समाजवाद सोडा, प्रामाणिक राष्ट्रवादी भूमिकेलाही यापेक्षा निराळा मार्ग स्वीकारणे शक्य नव्हते.

 नेहरूंच्या या घडपडीमुळे आपण पोलादाचे उत्पादन ५-६ पट वाढवू शकलो. कोळशाचे उत्पादन २ ॥ पटीने वाढविले. अल्युमिनियम तर आपल्याजवळ नसल्यातच जमा होता, तो कैक पटीने वाढला. स्वातंत्र्याच्या जन्मकाळी आम्ही ६०० टन शिसे दरसाल तयार करीत होतो, आता २४,००० टन तयार करत होतो. आणीबाणीच्या वेळी देश संकटात असेल तर सर्व देश एका दिवशी जागृत करण्याचे साधन फक्त रेडिओ असते. स्वातंत्र्यकाळी या देशात २५,००० रेडिओ सेट होते, जे प्रामुख्याने मोठ्या शहरांतून पसरलेले होते. आज या देशात १४ लक्षांहून जास्त रेडिओ सेट आहेत आणि त्यातील जवळजवळ निम्मे ग्रामीण भागात पसरलेले आहेत. म्हणून आणीबाणी २४ तासांत देशभर जाहीर करता आली.

पाकिस्तानविरुद्ध शास्त्री लढले, इंदिरा गांधी लढल्या पण या देशात रणगाड्यांचे कारखाने, विमानांचे कारखाने १९५३ साली सुरू झाले. स्वयंचलित शस्त्रास्त्रांचे कारखाने ५५ ला सुरू झाले. या देशातील अप्रगत अशा शस्त्रांचे पण प्रचंड उत्पादन आपल्या हाती ६७ पासून पडू लागलेले आहे. म्हणून जगाच्या धमक्या नजरेआड करून महिना दोन महिने आम्ही लढू शकतो. हा सर्व शस्त्रसाठा शांततेची कबुतरे आकाशात रोज सोडणाऱ्या एका शेळपट म्हणून ओळखल्या गेलेल्या पंतप्रधानाने उभारलेल्या कारखान्यांचा आहे. त्याने धडपडीने पेट्रोलचे उत्पादन २ लक्ष टनांवरून १॥ कोटी टनांवर नेले म्हणून विमाने चालतात; म्हणून सेना रणांगणावर जाऊन पोचते; म्हणून सेनेला अन्नपुरवठा होऊ शकतो.

भारत स्वतंत्र झाला त्या वेळी आमच्याजवळ रेल्वेची इंजिनेही नव्हती आणि जहाजेही नव्हती. आधुनिक जगात ज्या शक्तीवर राष्ट्र स्वाभिमानाने जगतात, ज्या पायाभरणीमुळे राष्ट्रांना स्वत्व टिकवणे शक्य होते, किंबहुना ज्यामुळे राष्ट्रांना राष्ट्रपणाचा दर्जा येतो ती पायाभरणी नेहरूंनी केली. ते समाजवाद्यांशी कसे वागले, हे विसरून जाऊन आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभे असणारे हे राष्ट्र, ही त्या शिल्पकाराची देणगी आहे, हे ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. 


     - नरहर कुरुंदकर

(इतिहास संशोधक, समीक्षक, विचारवंत व राजकीय-सामाजिक विषयाचे भाष्यकार)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.