Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व शेतमजुरांची घर मागणीसाठी जोरदार निदर्शने!

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व शेतमजुरांची घर मागणीसाठी जोरदार निदर्शने!


निवारा बांधकाम कामगार संघटना आयटक व भारतीय खेत मजदुर युनियन (BKMU) यांच्या वतीने 1000 पेक्षाही जास्त कामगार स्त्री पुरुषानी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते दोन वाजेपर्यंत जोरदार निदर्शने केली. संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदना मधील मागण्या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की,  जे बांधकाम कामगार मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगार मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या विधवा महिलांना व वारसांना कल्याणकारी मंडळाच्या नियमानुसार दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य त्वरित देणे आवश्यकच आहे. विशेषता  काही कुटुंबानी त्या बांधकाम कामगारांचे वार्षिक श्राद्ध घातल्यानंतर सुद्धा त्यांना आद्यापी अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम सुद्धा मिळालेली नाही. आठ महिन्यापूर्वी सांगलीमध्ये कामगार मंत्री श्री हसनजी मुश्रीफ व पालकमंत्री श्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते शकील दस्तगीर मुलानी व सलीम इस्माईल बागवान यांच्या दोन विधवा महिलांना दोन लाखाचे डिजिटल चेक देण्यात आले. परंतु रक्कम मात्र अद्याप मिळालेली नाही.

2019 साला मध्ये आलेल्या महापुरामध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे वाहून गेली अथवा बाधित झाली त्यांना दोन लाख रुपये कल्याणकारी मंडळाकडून आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत तीन हजार कामगारांनी अर्ज करूनही त्यांना अद्यापही आर्थिक सहाय्य मिळालेले नाही ते प्राधान्याने मिळावे अशी मागणी करण्यात आली.

 ग्रामीण भागामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत घरासाठी दोन लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे त्याबाबत ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून काहीही कारवाई केली जात नाही ती कारवाई ताबडतोब होण्यासाठी आदेश करावा अशी मागणी करण्यात आली. सांगली जिल्ह्यामध्ये किमान सध्या सात हजार बांधकाम कामगारांचे अर्ज निर्णयाविना प्रलंबित आहेत त्याबाबत सत्वर निर्णय करण्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांना  आदेश करावा अशी मागणी करण्यात आली.


भारतीय खेत मजदुर युनियनच्या वतीने अशीही मागणी करण्यात आली की ग्रामीण भागामध्ये ज्यांना स्वतःला राहण्यासाठी घर नाही जमीन नाही त्यांना घर बांधण्यासाठी जमीन सत्वर देण्यात यावी. रोजगार हमी योजनेवर वर्षातून दोनशे दिवस काम मिळावे व दररोज किमान पाचशे रुपये कामाचा मोबदला मिळावा अशी ही मागणी करण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार 357 बेघरांना घरकुले देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप महानगरपालिकेकडून होत नसल्यामुळे त्याबाबतही घरकुले पूर्ण करून बेघरांच्या ताब्यात देण्यात बद्दल आदेश करावा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाबद्दल बोलताना सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले की हे सर्वच विषय अत्यंत गंभीर आहेत याबाबत सर्व माहिती संघटनेस कळवण्यात येईल.

या आंदोलनाचे नेतृत्व निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी, जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे, भारतीय खेत मजदुर युनियनच्या सचिव कॉ अश्विनी कांबळे, अध्यक्ष कॉम्रेड विशाल बडवे तसेच बांधकाम कामगार संघटनेचे नेते प्रतिनिधी बाळासाहेब कोल्हे, विनोद पानबुडे, संतोष बेलदार, रोहिणी कांबळे, ललिता पाटील, शांताबाई चव्हाण, बाबासाहेब वनिता हिप्परकर, अनिता बनसोडे, मनीषा पवार,सीमा पवार, विजय पाटील, शुभांगी गावडे, सुजाता ढोले इत्यादिनी नेतृत्व केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.