Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तिला कॅन्सर आहे.. ती काही वाचणार तर नाहीच ..

"तिला कॅन्सर आहे.. ती काही वाचणार तर नाहीच ..


"तिला कॅन्सर आहे.. ती काही वाचणार तर नाहीच .. कशाला उगीच तिच्या उपचारावर पैसे वाया घालवता...!" .. किती भयंकर आहे हे आईवडिलांना ऐकणं, ज्यांच्या ९ वर्षाच्या मुलीला ओव्हरीजचा कॅन्सर झाल्याचं कळलंय... आधीच मनाने खचलेल्या पालकांसाठी हे ऐकणं नक्कीच मरणप्राय यातना देणारं असणार! ... पण ... त्यांचं हृदय मानलं नाही... पोटच्या गोळ्याला तसंच मरणाच्या दारात तसंच टाकून देणं त्यांना जमलं नाही!

... कॅन्सर काय असतो, हे त्या पोरीला माहितीही नव्हतं! चंदिगढ हॉस्पिटलमध्ये रोज सोबतचा एकेक बेड 'रिकामा' होत असताना ती पाहत होती... "मला पण तुम्ही असंच उचलून न्याल का?", तिचा भाबडेपणाचा प्रश्न त्यांचं अंतःकरण पिळवटून टाकणारा होता ..... पण त्यांनी हिंमत ठेवली ...   डोळ्यात तेल घालून उपचार केले... 'आम्ही तुला ठीक करून घरी घेऊन जाऊ!", त्यांनी मुलीलाही भावनिक आधार दिला!

.... ती ६-७ महिने चालू शकली नाही... काही खाल्लं की उलटीतून बाहेर पडत असे...  तीन वर्षांच्या उपचारानंतर ती जिंकली...! तिने कॅन्सरवर मात केली पण त्यासाठी तिच्या ओव्हरीज काढाव्या लागल्या! ... त्यानंतर तिचे नेहमीप्रमाणे शाळेत जाणे सुरु झाले! ...

...  ऑपरेशन झाल्यानंतर सहा महिन्यांनी तिने २०१४ मध्ये स्पोर्ट्स क्लाइंबिंग जॉईन केला... अर्थातच नुकतेच ऑपरेशन झाल्याने सुरवातीला विरोध झाला पण मानसिक बळ दिलं ते तिच्या स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आजोबांनी ..! शाळेत एकदा कलाईम्बिंग कॉम्पिटिशनसाठी फॉर्म्स आले.. तिने त्यातही भाग घेतला...

डिस्ट्रिक्ट... झोनल... नंतर नॅशनल ..... ती यशाच्या पायऱ्या 'क्लाइंब' करत गेली! .. २०१५ ते २०२२ म्हणजे जवळपास ७ वर्षांच्या क्लाइंबिंग प्रवासात तिने १२ गोल्ड, १२ सिल्वर आणि २ ब्रॉन्झ मेडल्स वगैरे मिळून २८ पदक जिंकले! तिने ७-८ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केलं!..  एक कॅन्सर सर्व्हायवर ऑपेरेशनंतर जवळपास १० वर्षांत यशस्वी क्लाइम्बर झाली! किती अशक्यप्राय वाटते हे!!...  कदाचित हे तिचे जाज्वल्य देशप्रेमच असेल ज्याचे बीज तिच्या आजोबांनी तिच्या मनात तेव्हा रोवलं जेव्हा ती कॅन्सरने बेडवर पडली होती! ... "एवढ्या कमी वयात तू इथे अशी पडली आहेस... मी देशासाठी इतकं केलं ... तू ही देशासाठी काही केलं पाहिजे..", ते बोलले आणि देशासाठी शक्य ते करायचा तिने तेव्हाच निर्णय घेतला! ..  तिला भीती वाटायची ती उंचीची! त्या कमजोरीलाच तिने जिद्दीने तिचे बलस्थान बनवले..  आज वयाच्या २० व्या वर्षी ती  भारताची #नंबर १फिमेलस्पोर्ट्सक्लाइम्बर आहे! .. #डरकेआगेजीत_है, म्हणतात ते उगीच नाही!!

"मला अजूनही देशासाठी खूप काही करायचं आहे ... माझ्या मृत्यूनंतर शहीद सैनिकांप्रमाणेच मला तिरंग्यात गुंडाळून न्यावं, अशी माझी इच्छा आहे!"... ती आत्मविश्वासाने बोलली!! ...

ही अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कहाणी आहे जम्मू येथील #शिवानी_चरक या   तरुणीची!! ... 'सिंगिंग सुपरस्टार' या कार्यक्रमात शिवानीबद्दल ऐकल्यावर मला माझ्यातील खुजेपण प्रकर्षाने जाणवला! .. 

..छोट्या छोट्या घटनांनी आपल्याला त्रास होतो ... आपण निराश होतो ... तक्रार करतो ...  जर तरच्या कल्पनेत रमून एखादी गोष्ट आपल्याला का जमली नाही त्याचे एक नाही हजार कारणं शोधतो! ... आपल्याला #अडचणी दिसतात ... आणि शिवानीसारख्या मुलींना #संधी! ...  When there is a will, there is a way!.. आपण पाठांतर करतो .. ते कृती करतात! त्यांच्यातील सकारात्मक दृष्टिकोन त्यांना घडवतो ... शिखरावर नेतो ... आणि आपण आहे तिथेच असतो परिस्थितीतील खुसपटं शोधत!

लेखिका - सुरेखा सर्यवंशी


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.