कॉंग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केलं ;पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. दोन महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. या निवडणूकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केले होते. असे धक्कादायक विधान चव्हाण यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी आर्थिक व्यवहार झाले आहेत, असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीतरी मोठ्या हालचाली घडत आहेत. हे मात्र निश्चित आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे कॉँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते; पण कॉँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणूकीवेळी चंद्रकांत हांडोरे यांच्यावर अन्याय झाला. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मी केली होती. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं त्यांच्यावर कारवाई व्हावी. अशी मागणी मी केली होती. निवडणूकीवेळी आर्थिक व्यवहार झाल्याप्रकरी समिती नेमण्यात आली. अहवाल देखील समितीने पक्षाच्या नेतृत्वाला पाठवण्यात आला आहे. आम्हीही काय कारवाई होणार हे पाहत आहोत", असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण एक पर्याय उभा करू शकलो नाही, तर काँग्रेस पक्षाची ऐतिहासिक चूक ठरेल. देशातील जनता आपल्याला माफ करणार नाही. देशात हुकूमशाही येण्याला काँग्रेसही तेवढीच जबाबदार असेल, कारण एक प्रभावी पर्याय देऊ शकलो नाही म्हणून. आगामी काळात काही निवडणुका आहेत, अशाच पद्धतीने पक्ष चालला तर निवडणुकांमध्ये फार आशादायक चित्र असेल, असे मला वाटत नाही, असे इशारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.