Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुन्हा एकदा 'सर्वोच्च' सुनावणी लांबणीवर; महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर 23 ऑगस्टला सुनावणीची शक्यता

पुन्हा एकदा 'सर्वोच्च' सुनावणी लांबणीवर; महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर 23 ऑगस्टला सुनावणीची शक्यता


महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज (22 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी मंगळवारी (23 ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात  प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आहे.

23 ऑगस्ट म्हणजेच, उद्या मंगळवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. यापूर्वी हे प्रकरण 22 तारखेला सहाव्या क्रमांकावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात होतं. पण आता पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या तीन तारखा लांबणीवर गेल्यामुळं आता तरी सुनावणी होणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत प्रकरणातच या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक फैसला होणार की, मोठ्या पीठाकडे प्रकरण सोपवलं जाणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबत असल्यानं खंडपीठ हेच राहणार का? याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा मेन्शनिंग करावं लागेल पण ती विनंती मान्य होईल का? याचीही उत्सुकता लागली होती. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल , अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. तर निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.

यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी पार पडली होती. या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली होती. यावर कोर्टानं महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

माझा न्याय देवतेवर विश्वास : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावरची सुनावणी लांबणीवर गेली आहे. अशातच ही सुनावणी आता मंगळवारी होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीत जनता गद्दारांना धडा शिकवेल, असा दावाही त्यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.