सासऱयाने पहाटेच्या सुमारास केला सुनेवर अत्याचार; शिवाय...
तुळजापूर : बार्शी तालुक्यातील कासारी येथील २३ वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरी अतीप्रसंग केला. शिवाय, जीवघेणा हल्ला करून विवाहितेचे मोबाईलसह रोख ६० हजार रुपये घेऊन पसार झाल्यावरून आरोपी सासऱ्या विरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २०१७ साली तिचा कासारी येथील तिच्या पतीसोबत प्रेमविवाह झाला होता.
पण पतीच्या घरच्यांना हा प्रेमविवाह मान्य नसल्याने आणि सासू सासरे सातत्याने त्रास देत असल्याने ते लोणी काळभोर (जि. पुणे) येथे वास्तव्यास गेले होते. आरोपी सासरा हा सोमवारी (ता. २०) पुणे येथे फिर्यादीच्या घरी गेला होता. शुक्रवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास आरोपी सासऱ्याने फिर्यादीचे कपडे काढण्याच्या उद्देशाने तोंड दाबून डोक्यात दगडी वरवटा घालून बेशुद्ध केले आणि घरातील मोबाईलसह रोख रक्कम ६० हजार रुपये घेऊन पसार झाला.
पीडित महिला आणि तिचे पती घाबरल्याने ते पीडित महिलेच्या माहेरी मंगरूळ (ता. तुळजापूर) येथे आले. त्यानंतर शनिवारी (ता. २५) तुळजापूर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्या वेळी तक्रार देण्यास गेलेल्या महिलेला सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांनी अपमानास्पद वागणूक देऊन दोन दिवस पोलिस स्टेशनमध्ये बसवले, अशी तक्रार पीडित महिलेने राज्य महिला आयोगाच्या संगिता चव्हाण आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. त्यानंतर रविवारी (ता. २६) मध्यरात्री आरोपी सासरा सौदागर मारुती लोंढे (रा. कासारी) याच्याविरुध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.