दिलीप मालवणकर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण म्हणजे : "शिळ्याकडीला ऊत"
काल विश्वास दर्शक ठरावा नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ रावजी शिंदे यांनी केलेले भाषण हे आभार प्रदर्शनापुरते मर्यादित असते तर ते नक्कीच सर्वांना आवडले असते परंतू त्यांनी केलेले भाषण त्यांनी केलेल्या बंडाचे व त्यांच्या भाषेत उठावाचे उदात्तीकरण करण्यासाठीच होते ,असे दिसून आले. बंडाला तुम्ही उठाव म्हटल्याने बंडाचे शुद्धीकरण होत नाही.तुमची वैयक्तिक काहीही कारणं असोत तुम्ही पक्षात राहूनच,ती सोडवायला हवी होती,हे माझेच मत नव्हे तर प्रत्येक शिवसैनिकाची भावना होती. शिवसैनिकांवर अन्याय झालेले आपण एकमेव शिवसैनिक आहात का ? आनंद परांजपे व अनंत तरे यांच्यावर तर आपणच अन्याय केला. त्यामुळे अनंत तरेंना आमदारकी पासून वंचित रहावे लागले तर आनंद परांजपेंना नाईलास्तव पक्ष सोडावा लागला,हे तितकेच खरे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत.पण जाऊद्या, आपल्या आनंदावर विरजण नको.
आपल्या भाषणात आपण शिवसेनेसाठी किती त्याग केला हे विस्ताराने सांगितले. आपण शिवसेनेसाठी जे केले त्याबद्दल माझ्यासह सर्व शिवसैनिकांत 10 दिवसांपुर्वी पर्यंत आदरच होता.धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर आपण ठाणे जिल्हा समर्थपणे सांभाळला व पक्ष वाढवला,हे आम्ही देखील मान्य करत आलो होतो. आपण जिल्हा नेते,आमदार व मंत्री होतात म्हणून आपण हे करू शकलात,हे आपण सोईस्करपणे विसरलात. आपण शिवसेनेसाठी दिवसरात्र काम केले कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही, श्रीकांतला वेळ देऊ शकले नाहीत,असेही म्हणालात. शिंदेजी असे कार्य करणारे आपण एकमेव नाहीत हे प्रथम लक्षात घ्यावे. पण त्या बदल्यात शिवसेनेने आपणांस काय नाही दिले ? धर्मवीर आनंद दिघे यांनी तर शिवसेनेसाठी ब्रम्हचर्य पत्करले, ना संसार केला ना नातेवाईकांचे हित जपले,ना कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली. या उलट आपण नगरसेवक, सभागृह नेते, चार वेळा आमदार,विरोधी पक्ष नेते, दोन वेळा कॅबिनेट मंत्री पद मिळवले,शेवटी शेवटी पक्ष फुटू नये म्हणुन मा.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणांस स्वतःचे मुख्यमंत्री पद देऊ केले.
अजून काय हवे होते तुम्हाला ? 1980 साली एक रिक्षाचालक असलेल्या आपणाला शिवसेनेचा परिसस्पर्श व दिघेसाहेबांची कृपादृष्टी लाभल़्याने आपण इतके श्रीमंत झालात की,आपल्यावर ईडीची वक्रदृष्टी वळली,आपण इतके श्रीमंत झालात की शिवसेनेचे व अपक्ष मिळून 50 आमदारांना व त्यांच्या समर्थकांना प्रथम सुरत,नंतर गुवा हत्ती, व नंतर गोव्याला व ताज या पंचतारांकित हाटेलमध्ये 10-12 दिवस बडदास्त ठेऊ शकलात, इतके श्रीमंत झालात की रिक्षाने ये-जा करावी इतक्या सहजतेने खाजगी चार्टर्ड विमानाने सुरत गुवा हत्ती,गोवा,मुंबई येथे ये जा करू लागले. आपण म्हणालात घराकडे/मुलाकडे श्रीकांत कडे लक्ष दिले नाही,शिंदेजी श्रीकांत डाक्टर कसा झाला ? किती शिवसैनिकांना आपल्या मुलांना डाक्टर करता आले ? आपण म्हणता,श्रीकांत कडे लक्ष देऊ शकलो नाही,मग तो दोन वेळा खासदार कसा काय झाला ? आज हजारो शिवसैनिक आहेत ते साधे शाखा प्रमुख वा एसईओपण होऊ शकले नाहीत. आपली दोन मुलं बुडाली,ही खुपच दुःखद घटना आहे, ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये,त्याबद्दल शिवसैनिकांत सहानुभूती होती व आहे पण तुम्हाला दिघेसाहेबांनी सावरले,असे हजारो आई बाप आहेत ज्यांची मुलं शिवसेनेमुळे देशोधडीला लागली,बायका विधवा झाल्या मुलं अकाली अनाथ झाली पण त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही. अशी असंख्य उदाहरणं मी गेल्या 50 वर्षात पाहिली आहेत.
दिलीप कपोते,रमाकांत चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, अशा अनेकांच्या हत्या झाल्या. यातील किती शिवसैनिकांच्या कुटुंबियांचे आपण सांत्वन केले ? किती लोकांना भेटलात ?आपण दिघे साहेब का होऊ शकला नाहीत. आपण काका कुलकर्णी, चंद्रकांत वाईरकर,विश्या खटाटे यांना ओळखतही नसाल.कारण त्यावेळी आपण बच्चे होतात.हे तेच शूरवीर शिवसैनिक आहेत ज्यांनी कम्युनिस्टांशी वैर पत्करले, कारावास भोगला, कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याचा खून केला. त्यामुळेच आपण पदं व मंत्रीपदे भुषवत आहात. या लोकांनी कधीच शिवसेनेकडून काही अपेक्षा ठेवली नाही की त्यांना नगरसेवक पद वा आमदारकीही लाभली नाही. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या मुलाच्या हातून चंदु वाईरकर यांच्या मुलाची बंदुकीची गोळी चुकून लागून मृत्यु झाला.विशाल त्याचे नांव होते. ते दु:ख चंदु मास्तरांनी पचवले पण त्या दुखा:चे कधीच प्रदर्शन केले नाही.उलट त्याच्या स्मृति जीवंत ठेवण्या साठी सार्वजनिक विश्वस्थ संस्था काढून समाज सेवेला वाहून घेतले.
आपण कधी तरी या चंदु मास्तर,काका कुलकर्णी,विद्या खटाटे, यांची भेट घेतली का ? आपण आपल्या खाजगी जीवनातील हा दु:खद प्रसंग धर्मवीर चित्रपटात प्रकर्षाने दाखवला,विधान सभेत आपण रडत रडत हा प्रसंग सांगितला.पण चंदु मास्तरांनी तो प्रसंग कधीच कोणाला सांगितला नाही.बाळासाहेबांच्या एका शब्दावर ते हिमालया एवढे दुःख पचवले.हाच फरक तुमच्यात आणि निष्ठावंत शिवसैनिकात आहे. वैयक्तिक माझ्याबाबतीत अनेकदा अन्याय झाले, नामांतर याच्या वेळी माझ्या घरावर हल्ला झाला होता.मला पराभूत करण्यात आपलेच शिवसैनिक पुढे होते,25 मतांच्या फरकाने मी पराभूत झालो कारण मी प्रथम महापौर झालेला त्यांना चालणार नव्हते, माझ्या घरावर आपल्या खासदार पुत्राला मी शिवसेनेचा प्रोटोकॉल न पाळल्याचे निदर्शनास आणून देताच त्याने माझ्या घरावर 50-60 शिवसैनिक पाठवले, मी भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आवाज उठवित असल्याने माझ्या पत्नीच्या बचत गटातील शालेय पोषण आहारात उंदराची लेंडी टाकणा-या लोकांना आपल्या खासदार पुत्राने कोणतीही शहनिशा न करता,शालेय पोषण आहाराचे काम हिरावून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांना लेखी पत्र देऊन केला,मी खमक्या असल्याने सर्वांना पुरून उरलो,शिवसैनिकाला कष्ट करुन कमवू न देणारे आपण हजारो कोटीचे मालक बनता, अन्याय करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपणच आहात.माझ्या विरोधात हेतू पुरस्सर शिवसेना विरोधी उमेदवार लादून मला त्याच्या विरोधात बंड करायला भाग पाडणारे जिल्हा प्रमुख आपणच होतात. अशा किती लोकांना तुम्ही बरबाद केले, अनंत तरेंना कुजवले, आनंद परांजपेंना पक्ष सोडावा इतकी परिस्थिती निर्माण करून आपण त्याजागी आपल्या डाक्टर पुत्राची वर्णी लावली.
अन्याय झाला म्हणुन ऊर बडवताना आपल्याला याचा का विसर पडावा ? चंदु मास्तरांना साधी आमदारकी मिळाली नाही,काका कुलकर्णी शेवटपर्यंत 150 चौरस फुटाच्या चाळीत राहीले. शिवसेनेसाठी बलिदान देणा-यांना व त्यांच्या कुटुंबियांना आपल्यासह सर्वजण विसरले पण ते एकनिष्ठ राहिले आपल्याप्रमाणे त्याचे भांडवल करून राजकिय जन्मदात्या व भाग्य विधात्या शिवसेने विरोधात कधीही बंड करण्याचा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आपण 39 आमदारांचे रडगाणे वारंवार गाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात.यात 4-5 वेळा आमदार झालेले ही आहेत.ते शिवसेनेने तिकिट दिले,संधी दिली म्हणून आमदार झाले.शिवसेनेने उमेदवारी दिलीच नसती तर ते कुठून आमदार झाले असते ? स्वबळावर अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतील,असे कितीसे आमदार आहेत.आपण म्हणता ते माझे आमदार आहेत ? त्यांना ईडीची पीडा नसती,त्यांच्या डोक्यात शिवसेना नेतृत्वाबद्धलचा द्वेश पेरला गेला नसता तर इतके आमदार फुटले नसते. आपण निधी न दिल्याचा बागुलबुवा करून आमदारांना फितवले,त्याचा पर्दाफाश अजितदादांनी कालच केला. गेली दोन वर्षे कोरोनाने देशासह महाराष्ट्रास ग्रासले होते,त्यामुळे विकास कामांचा निधी कोरोना वर मात करण्यासाठी वापरला गेला त्यामुळे देशाचीच अर्थ व्यवस्था कोलमडून पडली होती,आणि आपण निधीचे तुणतुणे वाजवून आमदारांची मनं कलुषित करून त्यांना फितुर करण्यात यशस्वी झालात. लवकरच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल पण तेव्हा वेळ गेलेली असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.