एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...
मुंबई: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तांतर झाले आहे. तसेच भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. काल शिंदेंना शिवसेना नेतेपदावरून काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्यावर मी काही बोलणार नाही, असे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवं होतं तर मला सांगायचं होतं, असा सवाल केला. तर आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र शिंदेंनी तेव्हा नकार दिला, असा दावा केला होता. त्याबाबत आज प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता मी त्या विषयावर अधिक काही बोलणार नाही असे विधान केले.
भाजपा नेते अमित शाह यांनी २०१९ मध्ये प्रस्ताव मान्य केला असता तर शानदार सरकार स्थापक झाले असते, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही आज कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही. ज्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवली त्यांच्यासोबतच आम्ही सरकार स्थापन केलं आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनल्यावर माझं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी राजीनामा दिल्याने आम्हाला आनंद झालेला नाही, असे स्पष्ट केले. तसेच मी स्वत:ला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो. मला पदाचा मोह नाही आणि स्वर्थासाठी मी निर्णय घेतलेला नाही. काही गोष्टी आवश्यकता भासल्यास स्पष्ट करण्यात येतील, असे सूचक विधानही केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.