Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा खोतकरांचा शब्द : संजय राऊत

 दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा खोतकरांचा शब्द : संजय राऊत


अर्जुन खोतकर  अजूनही शिवसेनेतच आहेत असा विश्वास शिवसेना  खासदार संजय राऊत  यांनी व्यक्त केला आहे. "दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा शब्द अर्जुन खोतकरांनी दिला होता," असा दावाही राऊत यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा केली होती. ते मला फोनवर बोलले होते की या रावसाहेब दानवे यांना  गाडल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला निवडणूक लढेन आणि रावसाहेब दानवेंना मी कायमचं घरी बसवेन. रावसाहेब दानवे यांच्याविषयी त्यांनी जे शब्द आणि वक्तव्ये केलेली आहेत, त्याचा उच्चार मी इथे करणार नाही. मला खात्री आहे अर्जुन खोतकर यांची गेल्या काही दिवसातील शिवसेनेच्या व्यासपीठावरील भाषणं ऐकली तर मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल आणि अर्जुन खोतकर अजूनही शिवसेनेत आहेत. ते स्वत: समोरुन सांगत नाही तोपर्यंत ते शिवसेनेत आहेत आणि ते शिवसेना सोडणार नाहीत.

खोतकर आणि दानवे यांची दिल्लीत खलबतं

दरम्यान अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या घरी पोहोचले आहेत. दानवेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून खलबतं सुरु आहेत. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब यांच्यात राजकीय वैर आहेत. पण शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीने दोन्ही नेत्यांमध्ये गोडवा आणल्याचं म्हटलं जातं. अर्जुन खोतकर यांनी अद्याप शिंदे गटाला समर्थन दिलं नसलं तरी ते याच वाटेवर असल्याचं म्हटलं जातं आहे.

...तर शिवसेनेला मोठा फटका

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहेत. जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याचं म्हटलं जात होती. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. त्यामुळे त्यांनी जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान खोतकर यांनी मात्र अद्याप शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिंदे गटात गेल्याच्या अफवा असल्याचं सांगत अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असं खोतकर म्हणाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.