Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेनेच्या बंडाचा खरा सुत्रधार एकनाथ शिंदे नाही तर शंभुराज देसाई!

 शिवसेनेच्या बंडाचा खरा सुत्रधार एकनाथ शिंदे नाही तर शंभुराज देसाई!


अखेर बुधवारी संध्याकाळी उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच्या बंडखोर आमदारांनी भाजपा आणि फडणवीसांच्या सत्तेचा राजमार्ग तयार करुन दिला. उध्दव ठाकरेंनी राजिनामा देण्यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेशी  भावनिक संवाद साधला आणि त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. त्यांचा हा संवाद भावनिक तर होताच पण त्याचबरोबर आपल्याच विश्वासू लोकांनी पाठीत खंजीर खुपसल्याने झालेल्या वेदना दाखवणाराही होता. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये उध्दव ठाकरेंच्याविषयी प्रेम, आत्मियता पाहायला मिळाली. 

मग ते घर कोणत्याही पक्षाशी संबंधित असो. सोशल मिडायावरही उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्ट, कमेंट्सचा अक्षरक्ष: पाऊस पडला. कॉग्रेस, राष्ट्रवादी व इतर अनेक छोट्या पक्षातील कार्यकर्ते उध्दव ठाकरेंसाठी हळहळ व्यक्त करत होते.  ज्या लोकांना राजकारण कळत नाही, ज्यांनी आजपर्यंत शिवसेनेचा विरोध केला तेसुद्धा उध्दव ठाकरेंचा  स्टेट्स मोबाईलमध्ये ठेवत होते. विचार करा या सर्व लोकांना जर इतकं वाईट वाटत असेल मग बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना काय वाटलं असेल ? महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे प्रेम मिळालेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्याशिवाय कोणीही नसावा असंच मला वाटतं. आता प्रश्न पडतो  उध्वव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं,  ठाकरे परिवाराला हतबल करण्याचं बळ एकनाथ शिंदेना कसं आलं आणि हे नीच शडयंत्र कसं शिजलं ? शिवसेना आणि ठाकरे परिवारासाठी एका पायावर जीव द्यायलाही तयार असणारे हे आमदार अचानक पालटले कसे ?

वास्तविक पाहता हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच फडणवीस आणि भाजपचे अनेक प्रयत्न चालू होते. ईडी व केंद्रातील अनेक यंत्रणांना घरगड्यासारखं भाजपाने महाराष्ट्रात कामाला लावले होते. साम-दाम-दंड-भेद वापरुन काहीही करुन महाराष्ट्रात आपलं सरकार आणायंच हेच ध्येय भाजपाचे होते. सरकार पाडण्यासाठी अनेक प्लॅन केले गेले. प्रत्येक प्लॅन नंतर भाजपा नेते सरकार पडणार म्हणून भविष्यवाणी करत होते. परंतु २ वर्षे झाली तरी भाजपा सरकार पाडण्यात यश आले नाही. मग भाजपाने शेवटचा पर्याय हाती घेतला तो म्हणजे,  आमदार फोडून बहुमताचा जादुई आकडा गाठायचा. त्यासाठी त्यांना अगोदर महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाचे किमान २/३ आमदार फोडायला लागणार होते.

त्यानंतर या फुटलेल्या आमदारांचा एक स्वतंत्र गट तयार करायचा आणि त्या गटाच्या पाठिंब्याने महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करायची हा मास्टर प्लॅन म्हणजे भाजपाच्या भाषेत ऑपरेशन लोट्स. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,  राष्ट्रीय कॉग्रेस या तीनही पक्षांचे संख्याबळ ४५-५५ च्या दरम्यानच होते.  यातील २/३ आमदार फोडायचे म्हणजे कोणत्याही पक्षाचे ३५-४० आमदार फोडायला लागणार होते. पहिला पर्याय म्हणून त्यांनी कॉग्रेस पक्षाची चाचपणी केली. कॉग्रेस‌‌ पक्ष फोडण्यासाठी एकदम सोपा पक्ष आहे असा भाजपाचा अनुभव आहे. कदाचित त्यामुळेच कॉग्रेसचे अनेक बडे नेते सध्या भाजपात नांदत आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत कॉग्रेसचे ३५-४० आमदार एका वेळी फोडणे आता शक्य नव्हते कारण कॉग्रेसमध्ये सध्या अनेक गट आहेत, त्यामध्ये अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रमुख गट आहेत. या सर्वांचे कॉग्रेसमधून बाहेर पडून भाजपाला पाठिंबा देण्यावर एकमत  होणे अशक्य आहे. त्याशिवाय एकाच वेळी कॉग्रेसच्या एकूण आमदारांपैकी ३५-४० आमदार घेऊन कॉग्रेसमधून बाहेर पडू शकेल असा एकही नेता आजच्या घडीला तरी कॉग्रेसमध्ये राहीलेला नाही. त्यामुळे कॉग्रेस या  पर्यायावर भाजपाने फुली मारली गेली. त्यानंतर दुसरा पर्याय होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचा! परंतु २ वर्षांपूर्वी आलेल्या पहाटेच्या अनुभवामुळे आणि शरद पवार यांच्या कसलेल्या राजकीय डोक्यासमोर आपला निभाव लागणार नाही, हे ओळखून भाजपा कोअर कमिटीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर क्षणाचाही विलंब न करता फुली मारली. 

           आता राहीलेला शेवटचा पर्याय म्हणजे शिवसेना. २५ वर्षे सेनेसोबत युतीत राहिल्याने भाजपा नेत्यांना सेनेच्या अनेक बड्या नेत्यांची अंडी-पिल्ली माहित होती. शिवाय सेनेत अंतर्गत गटबाजी किंवा बड्या नेत्यांचे वेगवेगळे गटही नव्हते, याचे कारण म्हणजे मातोश्रीच्या आदेशानुसार चालण्याची शिवसैनिकांची पद्धत. शिवाय ज्यांचे गट होते ते नारायण राणे, राज ठाकरे,  छगन भुजबळ कधीच सेना सोडून बाहेर पडले होते. त्यामुळे सेनेतील विखुरलेल्या आमदारांना गळाला लावणे अगदी सोपं आहे हे भाजपाने ओळखले. पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, एकनिष्ठ शिवसैनिक आमदार फोडण सहज शक्य होणारी गोष्ट नव्हती. आता भाजपाला गरज होती एका अशा हेराची जो सेनेत राहून सेनेच्याच गोटातील, मंत्रीमंडळातील सर्व माहिती पूरवेल व तो एकदम विश्वासूही असेल आणि भाजपाचा तो हेर म्हणजे पाटणचे आमदार शंभूराज देसाई जे मंत्रीमंडळातही गृहराज्यमंत्री म्हणून होते शिवाय सेनेच्या अनेक बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंधही होते. तुम्हीं म्हणाल शंभुराज देसाईच का ? तर त्याचे पहिले कारण म्हणजे शंभुराज देसाई हे काही कट्टर शिवसैनिक नाहीत, निवडणूकीपूरते सेनेचे चिन्हं वा़परतात.  निवडणूकीनंतर ते  देसाई गट म्हणून  मतदारसंघात वावरत असतात. आजपर्यंत देसाई सेनेच्या तिकीटावर  ३ वेळा आमदार झाले परंतु सेना वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न शुन्यच म्हणावे लागतील. 

पाटण मतदारसंघात सेनेचा वेगळा गट कार्यरत आहे जो सेनेशी सदैव एकनिष्ठ आहे. हा गट गेली अनेक वर्षे देसाई यांच्या विरोधात तक्रारही करत होता परंतू सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केले.  देसाई यांनी सेनेचा हा एकनिष्ठ गट आपल्या मतदारसंघातून कसे संपेल याची पूर्ण तजवीज वेळोवेळी केली.  प्रत्येक निवडणुकीत या शिवसेना एकनिष्ठ गटाचे उमेदवार पाडून, त्यांची राजकीय गळचेपी करुन शिवसेना आपल्या मतदारसंघात रुजणार नाही, वाढणार नाही व आपल्याला डोईजड होणार नाही याची देसाई यांनी पूर्णपणे खबरदारी घेतली. देसाई यांनी या सेना एकनिष्ठ गटा विरोधात एवढं करुनही या बिचाऱ्या शिवसैनिकांना मातोश्रीच्या आदेशामुळे विधानसभेला या देसाईंनाच मतदान करावे लागत होते. थोडक्यात काय तर शंभुराज देसाई यांना सेनेविषयी कोणत्याही प्रकारची आत्मियता नव्हती. दुसरे कारण म्हणजे शंभुराज देसाई यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध. देसाई आणि फडणवीसांच्या मैत्रीचे किस्से तर तुम्हीं ऐकले असतीलच. याच देसाईंच्या मतदारसंघात फडणवीसांच येणं-जाणंही होतं. जर २०१९ ला भाजपा-सेना युतीने एकत्रीत निवडणूक लढवली नसती तर कदाचित देसाईंनी भाजपात प्रवेश केला असता, एवढी त्यांची मैत्री घनिष्ठ आहे.  देसाई सेनेतील अंतर्गत माहिती, मतभेदांची कल्पना फडणवीसांना वेळोवळी देत राहिले. देसाई यांच्या या गुप्त माहितीच्या आधारेच सेनेतील अनेक नेत्यांच्याभोवती ईडीचा फास आवळला गेला. 

याचा मुख्य हेतू होता सेनीतील आमदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणे‌. ईडीच्या कारावाईच्या भितीमुळे सेनेतील अनेक आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. सेनेत उध्दव ठाकरेंनंतर ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे नेते म्हणजे एकनाथ शिंदे. काही महिन्यांपूर्वी शिंदे आणि अदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी झाली ही बातमी आली होती. त्यामुळे उध्दव ठाकरेही शिंदेवर नाराज झाल्याचे समजत होते.  या सर्व घटनांमुळे शिंदेही पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. ही माहिती भाजपा गोटात पोहचली आणि हिच ती सेना फोडण्यासाठी योग्य वेळ आहे हे ओळखून, काही दिवसांपूर्वी शिंदेंवर ईडीचा डाव टाकला गेला. कसा आणि कुठे डाव टाकायचा ही माहिती अगोदरच पोहच केली गेली होती. अपेक्षेप्रमाणे पक्षातील मतभेद आणि ईडीच्या कारावाईची धास्ती यामुळे शिंदे अस्वस्थ झाले. या परिस्थितीचा फायदा उठवून शंभुराज देसाई यांनी सेनेत राहून तुमचा अपमान, गळचेपी करुन घेण्यापेक्षा, आपलं भाजपासोबत जाणं कसं योग्य आहे हे पटवून दिले. मुख्यमंत्री पदी तुम्हीं आणि शिवाय ईडीचा कोणताही धोका नाही ही सेटलमेंट ठरली. परिस्थितीच अशी निर्माण केली गेली की शिंदेही बरोबर जाळ्यात अडकले. राज्यसभा मतदानावेळी सर्व सेनेचे आमदार एकत्र येणार असल्याने तोच मुहूर्त ठरला. मतदान झाल्यानंतर सेना आमदारांना शिंदेंनी आपण जेवायला बाहेर जायचे सांगून गाडी सुरतच्या दिशेने वळवली. या बंडखोरीची कल्पना सेनेतील बहुतांश आमदारांना प्लॅन बाहेर येऊ नये म्हणून अगोदर देण्यात आली नव्हती. 

सुरतमध्ये गेल्यानंतर या आमदारांना हा प्लॅन पटवून देण्यात आला. त्यामुळेच कैलास पाटील या आमदाराला घाबरून मुंबईत पळून यावे लागले कारण पाटील यांना काहीच कल्पना नव्हती काय चाललंय याची. सर्व बंडखोर आमदारांना प्लॅन पटवून देण्यासाठी फडणवीस, शहा यांच्याशीही संपर्क करुन देण्यात आला, सर्व ऑफर दिल्या गेल्या. महाराष्ट्रात मागे राहीलेल्या एकनिष्ठ अगदी ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेल्या आमदारांना ही ऑफर समजल्यानंतर ते पक्ष,निष्ठा, जनतेच्या भावना पायदळी तुडवून सुरत, गुहाटीला पोहचले. मग विचार करा कसली भक्कम ऑफर असेल ? या सर्व आमदारांचे जराही मतपरिवर्तन होऊ नये म्हणून त्यांची राजेशाही थाटात काळजी घेतली गेली. त्यानंतर काय घडलं हे मी सांगायची गरज नाही. आज महाराष्ट्रातील तमाम जनता, सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना शिव्याशाप देत आहे, गद्दार म्हणत आहे पण खरा सुत्रधार वेगळाच होता आणि दुर्दैव म्हणजे सेनेने स्वतः त्या सुत्रधाराला वाढवलं, मोठं केलं होतं. यालाच तर फडणवीस नीती म्हणतात.

           - सदाशिव नवलेकर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.