Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही"; राज्यपालांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

"माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही"; राज्यपालांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा


एखाद्या राज्याचे राज्यपाल आणि देशातील सत्ताधारी पक्ष यांचे सहसा जिव्हाळ्याचे संबंध असतात. राज्यपाल केंद्र सरकारवर टीका करताना दिसण्याचे प्रसंग फार कमी पाहायला मिळतात. पण मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या न पटणाऱ्या गोष्टींवर टीका करतात. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही आणि माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे. पंतप्रधान मोदींच्या संकेताची वाट पाहत आहे, असा इशारा सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.

सत्यपाल मलिक यांनी एका चॅनेलशी बोलताना सांगितले की, "मी अशा शेतकऱ्यांबद्दल बोललो जे केंद्र सरकारच्या बाजूने गेले असते आणि शेतकरी आंदोलन झाले नसते. ७०० शेतकरी मरण पावले आहेत आणि त्यांच्याबाबत साधा शोक संदेश पाठविला गेला नाही हे चुकीचे आहे. उलट मोदी सरकारने नंतर माफी मागून हे विधेयक मागे घेतले. त्यामुळे मी नेहमीच जनतेच्या बाजूने बोललो आहे आणि अजूनही बोलत आहे."

अग्निपथ योजनेबद्दल सत्यपाल मलिक म्हणाले, " मुलांसंबंधी असलेल्या अग्निपथ योजनेबाबत लवकर विचार करा. अशा गोष्टी घडणे चांगले नाही. असंतुष्ट मुलं सैन्यात गेली तर त्यांच्या हातात रायफल असेल, अशा वेळी ती बंदुक कोणत्या दिशेला वळू शकेल याची आपण कल्पना करू शकत नाही. केंद्र सरकार कमालीच्या उद्दामपणात जगत आहे. त्यामुळे यापेक्षा वाईट काहीही घडण्याआधीच काहीतरी करा. बॅकफूटवर या आणि योग्य निर्णय घ्या."

"मी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून माझ्या खिशात राजीनामा आहे. ज्या दिवशी मोदींकडून संकेत मिळतील, त्या दिवशी मला हटवावे लागणार नाही. मीच माझा निर्णय घेईन. फक्त असे म्हणा की मला तुमच्याबरोबर काम करणे अस्वस्थ वाटते. मी त्याच दिवशी निघून जाईन", असा थेट इशाराच मलिक यांनी पंतप्रधान मोदींना दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.