Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाण्याच्या पालापाचोळ्याची शिवसेनेला गिळण्याची काय बिशाद, निवडणुका होऊन जाऊ द्यात, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

ठाण्याच्या पालापाचोळ्याची शिवसेनेला गिळण्याची काय बिशाद, निवडणुका होऊन जाऊ द्यात, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज



मुंबई : "वादळ म्हटल्यानंतर पालापाचोळा उडतोच... तो पालापाचोळा उडतोय सध्या आणि तो पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर येईल. सडलेली पानं झडणारच, ती झडलीच पाहिजेत... पानगळ झाली की झाड उघडं बोडकं दिसायला लागतं... पण काहीच दिवसांत झाडाला पुन्हा नवी पालवी फुटते.. आपल्या झाडालाही नवे अंकुर फुटतील कारण शिवसेना आणि तरुण हे नातं सेनेच्या जन्मापासून आहे", असं सांगतानाच ठाण्याच्या पालापाचोळ्याची शिवसेनेला गिळण्याची काय बिशाद?, निवडणुका होऊन जावू द्यात मग कळेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ललकारलं. 

ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली ताकद दिली, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या आयुष्यात 'ठाण्यानं सत्ता दिली' असं अभिमानानं सांगत राहिले. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं. आता शिवसेनेचे नेतृत्व म्हणून आपला प्लॅन काय?, असा थेट सवाल 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'पालापाचोळा' असा करत ज्या आईने मोठं केलं, त्याच आईला गिळणारी ही अवलाद आहे, अशा ठाकरी भाषेत शिंदेंवर शरसंधान साधलं. 'सामना'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार आसूड ओढले. 

निवडणुका होऊ द्यात, जनता बंडखोरांना गाडल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब त्यांच्या आयुष्यात 'ठाण्यानं सत्ता दिली' असं अभिमानानं सांगत राहिले. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं, असं संजय राऊत म्हणताच उद्धव म्हणाले, ठाणेकर जनता सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे, ते ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक, ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही. 

ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. ज्यावेळी निवडणूक होईल, तेव्हा जनता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. आईला गिळायला निघालेली ही अवलाद "मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी आणखी काय वेगळं केलं असतं? कारण यांची भूक भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रिपद पण हवंय आणि आता यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलेत हे आता... राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांचे ठाकरी भाषेत वाभाडे काढले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.