एकनाथ शिंदेंना खरंच सर्वात मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला
मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात खरंच मोठी कारवाई करण्यात आली की काय? याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन खरंच काढलं का?
याबाबत शिवसेना पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण पक्षाकडून खरंच ही कारवाई करण्यात आली असेल भविष्यात तर शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात. सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या लेटपॅडवरीलच ते पत्र आहे. तसेच त्या पत्रावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. पण त्या पत्रात इंग्रजीमध्ये मजकूर छापलेला आहे. या मजकूरमध्ये व्याकरणाच्या देखील चुका आहेत. त्यामुळे हे पत्र खरं की खोटं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात काम केल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटवत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी पत्र पोहोचलं, पण... एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी देखील हे पत्र पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या पत्राबाबत शिवसेनेचे पदाधिकारी, नेत्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत आपल्या माहिती नसल्याचं म्हटलं.
तसेच शिवसेनेकडूनही या पत्राबाबत कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे पत्रात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने याबाबतचा निर्णय घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण त्याबाबतची अधिकृत माहिती शिवसेनेकडून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे संबंधित पत्र हे इंग्रजीत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.