"मुलीच्या लग्नाला पैसे नव्हतं, तेव्हा नारायण राणेंनी आर्थिक मदत केली"
मुंबई : काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने राज्यात फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना मुलाखत देताना बंडाची ठिणगी पेटण्यापासून ते गुवाहाटी, गोवा आणि गव्हर्मेंट असा प्रवास दिलखुलासपणे उलघडला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांना बंडखोरी का केली आणि निधीमध्ये कशाप्रकारे दुजाभाव केला जायचा, याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी, मातोश्रीवर होत असलेल्या दुर्लक्षपणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर, आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी, नारायण राणेंनी मुलीच्या लग्नासाठी केलेल्या मदतीचीही आठवण त्यांनी सांगितली.
एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे. राग शून्य आणि सगळ्यांना शांततेनं समजावून सांगणारं नेतृत्त्व. एकनाथ शिंदे हे खरोखर क्षमता असलेलं नेतृत्व आहेत, अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच, उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्याजवळील चौकडीबद्दल त्यांनी राग व्यक्त केला. विविध माध्यमांनी मुलाखत देताना दिलखुलापणे त्यांनी राजकीय प्रवास उलगडला. यावेळी, आपण जमीन विकून निवडणूक लढविल्याचंही त्यांनी सांगितलं.
निवडणूक लढविण्यासाठी मी ऊसाची जमिन विकली, ऊसासकट जमिन इकली. एकीकडे मी निवडणुकीचा अर्ज भरायला जायचो अन् त्याच बाजूच्या ऑफिसात माझी बायको जमिनीचा कागद करायला जायची, असे म्हणत आपल्याला ईडी भीती नाही, कारण आपल्याकडे काही नाहीच. याउलट आपलंच विकलंय, असे शहाजाबापू पाटील यांनी म्हटले. तसेच, यावेळी, नारायण राणेंची एक आठवणही त्यांनी सांगितली. माझ्या मुलीचं लग्न होतं, मुलीच्या लग्नासाठी जवळ पैसे तर नव्हते. तिकडून जावयाचा फोन आला, की मला आता सुट्टया आहेत, तेवढ्यात लग्न उरकून घेऊ. मग, मी कामाला लागलो.
माझ्याकडे पत्रिका छापायला पण पैसे नव्हते. मात्र, लग्न करायचं होतं, मी नारायण राणेंना पत्रिका द्यायला गेलो. त्यावेळी, मित्राला राणेसाहेबांना हाटकायला सांगितलं. माझ्या मुलीचं लग्न हे सांग म्हटलं, पैसे माग म्हटलं. मग, नारायण राणेंनी मला 25 लाख रुपये दिलं. शिंदेसाहेबांनीही पैसे दिले, विलासराव देशमुखांनाही पैसे दिले. अशारितीने पैसे गोळा करुन मी 1 ते सव्वा कोटी लग्नावर खर्च केल्याची आठवण शहाजी बापूंनी सांगितली. तर, लग्नात गावजेवण दिलं, सव्वा तीन लाख बिस्लेरीच्या बाटल्या आणल्या होत्या, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.