Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विलासराव,महाराष्ट्र तुमची आज आठवण करतोय.... - मधुकर भावे

 विलासराव,महाराष्ट्र तुमची आज आठवण करतोय....  - मधुकर भावे



गेले ६ दिवस मुंबईसह महाराष्ट्राला धुवाँधार पाऊस झोडपून काढत आहे. १६ जिल्हे पाण्याखाली होते. कोकणातील सर्वच जिल्हे अजूनही पाण्याखाली आहेत. घराघरांत पाणी आहे.  पाणी थोडे ओसरले नाही तोच घरघरांत चिखल आहे.  गरिबांचे संसार याच चिखल-पाण्यात दिवस कसे काढत असतील... कल्पनाही करवत नाही. बाहेर कोसळणारा पाऊस, घरात पाणी नंतर चिखल, सगळीकडे ओल... कच्ची-बच्ची कुठे झोपत असतील? महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रे पुराची छायाचित्रे देण्यात खूष आहेत. सगळ्या वाहिन्या धो-धो वाहणाऱ्या नद्यांचे अक्राळ-विक्राळ रूप दाखवण्यात धन्यता मानत आहेत. कोकणाप्रमाणेच विदर्भ - मराठवाड्यालाही तुफान पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी तुफान पाऊस... काही ठिकाणी अजूनही कडक उन आहे.  निसर्गाचा हा खेळ आहे. पण महाराष्ट्रातील जे जिल्हे निसर्गसंकटाने अडचणीत सापडले आहेत, ज्यांना तातडीने धान्याची गरज आहे, ज्यांच्या घरात रॉकेल नाही... पोरांना खायला नाही... अशा अवस्थेमध्ये सापडलेल्या महाराष्ट्राला आज विलासराव देशमुख यांची आठवण होते आहे. १७ वर्षांपूर्वीचे २५, २६, २७ जुलै २००५ हे तीन दिवस आठवत आहेत.... त्या सगळ्या घटनांचा एक साक्षीदार म्हणून आज विलासराव डोळ्यांसमोर येतात. त्यावेळच्या सरकारने, म्हणजे विलासरावांनी, त्यांच्या महसूल मंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी, सामान्य प्रशासन विभागाने, गृह खात्याने जे काही काम केले, त्याला तोड नव्हती. सरकार संवेदनाशील असते तेव्हा ते लोकांच्या सुख-दु:खाशी कसे समरस होते, ते विलासरावांनी दाखवून दिले. अर्धा महाराष्ट्र पाण्याखाली जातोय, हे दिसल्यावर तातडीने प्रत्येक जिल्ह्यात, गावात, मुंबईत... दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, दहा लीटर रॉकेल आिण १००० रुपये किरकोळ खर्चासाठी रोख... याचे वाटप याच शासकीय यंत्रणेने ज्या तडफेने, गरिबांबद्दलच्या आत्मियतेने केले आहे.... 

शासकीय यंत्रणेवर टीका करणे सोपे आहे... पण संकटकाळात ही यंत्रणा कसे काम करते, हे ११ जुलै १९६१ साली पानशेतच्या महापुरात पुणे उद्धवस्त झाले तेव्हा पाहता आले. ५ डिसेंबर १९६६ ला कोयनेच्या भूकंपानंतर हीच मदत तत्परतेने कशी होते तेही पाहता आले. ७ मे १९७० च्या भिवंडी दंगलीनंतर जात-धर्मांमध्ये तेल न ओतता, त्यावेळच्या वृत्तपत्रांनी, त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी भिवंडीत मुक्काम करून, सर्व समाजात एकोपा कसा निर्माण होईल, याची किती तातडीने दखल घेतली. अशा प्रत्येक घटनेची आज आठवण होत आहे. १२ मार्च १९९३ चा मुंबईतील बाँम्बस्फोट.... २४ तासांत मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुंबई मार्गी लावली. असे अनेक प्रसंग आठवतात... ३० सप्टेंबर १९९३ चा किल्लारीचा भूकंप.... दहा तासांत त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार तेथील ढिगाऱ्यांवर उभे होते. दहा दिवस मुक्काम करून त्या महासंकटावर मात झाली.  

मुंबई आणि महाराष्ट्रावर महापुराचे सगळ्यात मोठे संकट जुलै २००५ ला आले. त्याचा मुकाबला करताना विलासराव हे मंत्रालयात बसले नाहीत. कोणाच्याही घरी राजकीय भेटीसाठी गेले नाहीत. मुंबईची वाहतूक कोंडी, उपनगरांतील हाहा:कार पाहण्यासाठी आणि उपाययोजनेसाठी विलासराव स्वत: बाहेर पडले. बदलापूर, कल्याण या ठिकाणचे ढिगारे, महापुरात मरून झाडांवर अडकलेली जनावरे, त्यांची दुर्गंधी... उद्धवस्त झालेली घरे, आपत्तीत सापडलेले नागरिक... या सर्वांना विलासराव थेट भिडले. त्यांच्यासोबत राहून ती आपत्ती मला पाहता आली. एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून सामान्य माणसांची दु:ख... काळीज पिळवटून टाकत होती. त्या दिवशी लिहिलेले आजही आठवते.... तो प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर आहे. बदलापूरच्या त्या ढिगाऱ्यात विलासराव उभे होते. त्यांचा मोबाईल माझ्या हातात होता. फोन वाजला.... तिकडून राष्ट्रपती अब्दुल कलाम बोलत होते. मी मोबाईल झटकन विलासरावांच्या हातात दिला. नंतरचा संवाद असा होता... 

‘मी आपणांस थेट फोन केला आहे.... महाराष्ट्र ज्या आपत्तीत आहे. त्यावेळी आपण जे निर्णय केले आहेत आणि त्यानुसार काम करत आहात, ते मी पाहतो आहे. माझ्या पूर्ण संवेदना आणि पाठिंबा आहे. माझ्याकडून जी जी मदत तुम्हाला लागेल नि:संकोचपणे मला सांगा... आणि तुमचे हे काम असेच चालू ठेवा... मी आपत्तीवर लक्ष ठेवून आहे. 


 

गो अहेड....’

विलासरावांनी त्यांचे मनापासून आभार मानले. बदलापूर, कल्याणच्या महापुराने केलेल्या हाहाकाराच्या पाहणीनंतर मोठ्या मुश्कीलीने दीड तासांच्या प्रवासानंतर ठाण्याला पोहोचलो. ठाण्यातही परिस्थिती बिकटच होती. तिथंही शेकडो लोकांच्या गराड्यात विलासराव लोकांना भेटायला घुसले. एकही सुरक्षारक्षक बाजुला नव्हता. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांना विचारले की, ‘मदत कशी पोहोचली ते सांगा... गहू, तांदूळ, रॉकेल पोहोचले का? हजार रुपयांचे वाटप झाले का?....’ कलेक्टर बोलू लागले.... त्यांना विलासरावांनी थांबवले... लोकांना विचारू लागले.... मदत मिळाली का? ७० टक्के लोकांनी मदत मिळाल्याचे सांिगतले. ज्यांना मदत मिळाली नव्हती त्यांना बाजूला केले. तातडीने मदत कशी पोहोचवायची याचा निर्णय केला. तिथे हजर असलेले आर.डी.सी यांना ती जबाबदारी सोपवली. रात्री ११ वाजेपर्यंत ठाण्यात मदतीच्या आढाव्याची बैठक झाली. रात्री विलासराव वर्षावर पोहोचले.  मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होती. त्यातून मार्ग काढत ते घरी पोहोचले. पहाटे पाच वाजेपर्यंत परिस्थितीचा आढावा घेत होते. तीन दिवस हे काम सतत चालू होते. हळूहळू पूर ओसरला. जीवन पूर्वपदावर आले. एखाद्या मुख्यमंत्र्याने ‘विषय संपला’, असे मानून आपले काम चालू केले असते.... विलासरावांनी या काळात यंत्रणेच्या विविध अिधकाऱ्यांना वर्षा निवासस्थानावर बोलावून प्रशासनाने केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञाता व्यक्त  केली. त्यावेळी  ते म्हणाले की, ‘ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांना अशा वेळी घरी बसणे शक्य नाही. आपण सर्वांनी मदत केलीत... मी एकटा काय करू शकणार होतो? ’ त्यानंतर एका वाहिनीवर त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी या सगळ्या भावना व्यक्त केल्या. 

आज १७ वर्षांपूर्वीचे हे सगळे आठवते आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात २००५ च्या महापुरासारखीच काहीशी परिस्थिती हे लिहित असताना आहे. एक-दोन दिवसांत पाऊस ओसरला की, परिस्थिती पूर्वपदावर येईल. निसर्गाचे संकट कोणी थांबवू शकत नाही. शिवाय पाऊस जास्त झाला तरी तक्रार करू नये... तो झाला नाही तर चिंतेचा विषय ठरतो. निराधार आकाशातून पडणारा पाऊस सगळ्या जगाचाच आधार आहे. त्यामुळे तो यायलाच हवा. नदी, नाले तुडुंब व्हायला हवेत. धरणं भरायलाच हवीत.... पण निसर्गाचे तांडव झाले तर राज्यकर्त्यांना स्वस्थ्ा बसता येत नाही. हे मागच्या सरकाराने. त्या त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. आज २००५ जसे आठवते त्याचप्रमाणे ११ जुलै १९६१ पानशेतचे धरण फुटल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण धावून गेले. लकडी पुलावर चिखलात उभे होते. स. गो. बर्वे नावाचा अिधकारी पुण्याचा महापालिका आयुक्त होता. त्याची कामाची तडफ बघून यशवंतरावांनी त्यांना पुढे महाराष्ट्रात अर्थमंत्री केले. यशवंतराव असतील, वसंतराव नाईक असतील... शरद पवार असतील.... विलासराव असतील... त्या त्या वेळच्या संकटांवर त्यांनी कशी मात केलेली आहे... 

या सगळ्या पाच दिवसाच्या धुवाँधार पावसात काही बातम्या ठळकपणे जाणवल्या. आताचे राज्यकर्ते किती तत्परतेने त्यांच्या सरकारचे शक्तीप्रदर्शन करीत आहेत.... ते ही ठळकपणे वाहिन्यांवर दिसत आहे. अब्दुल सत्तार शिवसेनेत आले... राज्यमंत्री झाले... त्यांची कमाल अशी की, एवढ्या धुवाँधार पावसात त्यांनी या सरकारच्या पाठिंब्यासाठी आपल्या मतदारसंघातील लोकं आणून मोठा पाठिंबा मेळावा घेतला. शिरसाट नावाचे आमदार तेही असा पाठिंबा मेळावा घेण्यात आघाडीवर होते. एवढा प्रचंड पाऊस असताना पाठिंब्यासाठी एवढ्या लोकांना आणणे, हे काही साधे काम आहे का? लोक किती अडचणीत आहेत, या विषयाला फार काही महत्त्व नाही. पाठिंबा मेळावे जोरदार झाले... तिकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी भेटायला गेले. राज ठाकरे राहतात त्या शिवाजी पार्कच्या शिवतीर्थ या नवीन बंगल्यात त्यांना भेटायला गेले. ही एक वेगळीच भेट होती. तिथे महापूर आल्याची काही बातमी नव्हती. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना तिथे जायला  महापुराचा त्रास झाला नाही. त्यामुळे भेट छान झाली. बाहेर धो-धो पाऊस... तिकडे पाठिंब्याचे भर पावसातील मेळावे.... इकडे उपमुख्यमंत्र्यांची मोठी राजकीय भेट... 

सध्या महाराष्ट्रात जे काही घडते आहे ते राजकारणाच्या निसर्ग नियमाप्रमाणे घडते आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या सामान्य माणसांची चिंता एवढ्यातच करावी, असे कारण नाही. अजून मंत्रिमंडळ वगैरे व्हायचे आहे... खातेवाटप व्हायचे आहे... अजून १५ दिवस लागले तरी काही हरकत नाही... विधानसभेचे अिधवेशन पुढे ढकललेच आहे. मागची दोन वर्षे विधानसभेला अध्यक्षच नव्हता. अध्यक्षाशिवाय विधानसभा चालू शकते, अशी ही अजब-गजब लोकशाही लोकांनी पाहिली. आता पाठिंबा, मेळावे, गाठी-भेटी हे आधी उरकले की मग मंत्रिमंडळ सावकाश होईल... महसूलमंत्री, कृषीमंत्री, आणखी इतर मंत्री... अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना भेटायला सवडतीने जातील.... त्याची चांगली जाहिरातही होईल... वाहिन्यावाले तयार आहेतच.... अशा तातडीच्या भेटीची आजच काय घाई आहे? शपथविधी घाई-घाईत झाला म्हणून सगळ्याच गोष्टीत घाई करायची नाही.... हा निर्णय खूपच चांगला आहे. त्यामुळे एकदा पूर ओसरला... सगळे विषय मार्गी लागले की, १५ अॅागस्टला झेंडावंदन, मग विधानसभा अधिवेशन, मग मंत्र्यांचे दौरे, अशी छान आखणी करता येईल. तिथपर्यंत अडचणीत असलेले लोक स्वत:च्याच हिमतीने सावरलेले सुद्धा असतील.... त्यांचे कौतुक करायला जायला हवेच... 

 - मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.