नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, सुप्रीम कोर्टाची भूमिका
भाजपच्या निलंबित नेत्या आणि माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने देखील कठोर भूमिका घेतली आहे. नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशात ज्या घटना घडल्या आहेत त्याला ही एकटी महिला जबाबदार ठरली आहे. वकील असतानाही अशी विधाने करणे लज्जास्पद आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले.
नुपूर शर्मा या भाजपच्या माजी प्रवक्त्या असून टीव्हीवरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी मोहम्मद पैगंबरांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा देश-विदेशातून विरोध झाला होता. कुवैत, यूएई, कतारसह अनेक मुस्लिम देशांनी हिंदुस्थानकडे तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला होता. तसेच हिंदुस्थानमध्ये या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता. काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही झाली.
नुपूर शर्मा यांच्याविरोधात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या. धमक्या येत असल्याने ही सर्व प्रकरणे दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात यावी अशा मागणीची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्यावर ताशेरे ओढले.
नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी. एखाद्या पक्षाची प्रवक्ता असल्यामुळे अशी विधाने करण्याचे लायसन्स त्या व्यक्तीला मिळत नाही. तसेच विशिष्ट उद्देष ठेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आले असेल तर अँकर विरोधातही गुन्हा दाखल करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
यादरम्यान नुपूर शर्मा हिचे वकील मनिंदर सिंह यांनी चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या अन्य एकाने त्यांना उकसावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायलयाने आम्ही संपूर्ण चर्चासत्र पाहिले असून त्यांना भडकावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते. परंतु त्यानंतर त्यांनी जे काही बोलले ते लज्जास्पद असल्याने न्यायालयाने म्हटले. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात भडका उडाला. उदयपूरमध्ये झालेल्या घटनेलाही त्याच जबाबदार असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.