डोलो ६५० बनविणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे
करोना काळात ताप, अंगदुखी साठी प्राधान्याने वापरल्या गेलेल्या डोलो ६५० गोळ्यांचे उत्पादन करणाऱ्या मायक्रो लॅब्जच्या मालकांच्या घरी आणि देशातील विविध शहरातील कारखान्यांवर असे एकूण ४० ठिकाणी आयकर विभागाने बुधवारी छापे घातले.
करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे घालण्यात आल्याचे समजते. कंपनीच्या बंगलोर येथील मुख्यालयातून अनेक महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुराणा आणि निदेशक आनंद सुराणा यांच्या निवासस्थानांवर छापे घातले गेले. आयकर विभागातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांच्या टीमने एकाचवेळी विविध शहरातील कंपनीच्या प्रकल्पांवर छापे टाकले आहेत.
करोना काळात या कंपनीने औषध विक्रीतून प्रचंड नफा कमावला होता. २०२० च्या करोनाच्या पहिल्या लाटेनंतर या कंपनीच्या डोलो ६५० नावाच्या ३५० कोटी गोळ्या विकल्या गेल्या होत्या आणि एक वर्षात या कंपनीने ४०० कोटींचा व्यवसाय केला होता. डोलोने विक्रीची सर्व रेकॉर्ड तोडली होती. ताप, वेदना कमी करणाऱ्या या गोळ्यांना प्रचंड मागणी होती. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार देशात १७ ठिकाणी कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. येथे डोलो ६५०, एम्लांग, लुब्रेक्स, डायप्राईड, विल्डाप्राईड, ओल्मार, एक्स ट्रायप्राईड आर्बिटेल अशा विविध औषधांचे उत्पादन होते. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात वह्या, आर्थिक उलाढालीच्या संदर्भातली कागदपत्रे, नेटवर्क वितरण संदर्भातील अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.