Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना मोठा धक्का; युरोपचा गॅस पुरवठा रशिया तोडणार

 युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना मोठा धक्का; युरोपचा गॅस पुरवठा रशिया तोडणार


मॉस्को : युरोपातील देशांनी घातलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ रशियाने युरोपला केल्या जाणाऱ्या गॅसचा पुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांसाठी हा एक मोठा धक्का आहे.

युरोपाच्या निर्बंधाच्या दबावामुळे रशियाने युक्रेनच्या धान्य वितरणाला अनुमती दिल्याचे मानले जाऊ लागले होते. मात्र प्रत्यक्षात रशियाने आपली भूमिका अधिकच कडक केल्याचे ताज्या निर्णयातून दिसून आले आहे.

जर्मनीला केल्या जात असलेल्या गॅसच्या वितरणामध्ये कपात केल्याचे रशियाची गॅस कंपनी गॅझप्रोमने जाहीर केले आहे. मात्र रशिया गॅस ब्लॅकमेलिंग करत असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केली होती. या महिन्याच्या पूर्वार्धात रशियाने गॅस पाईप लाईनची देखभाल करण्याच्या सबबीखाली गॅस पुरवठा 10 दिवसांसाठी बंद ठेवला होता. पाच दिवसांपूर्वीच हा गॅस पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला होता.

युरोपाला आपत्कालिन गॅसचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी युरोपीय संघाने नुकतीच मान्य केली आहे. मात्र रशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या 27 सदस्य देशांना युरोपीय संघाने 15 टक्के कमी गॅसचा वापर करण्याची सूचनाही केली होती. 

रशियाकडून गॅसचा पुरवठा खंडीत केला जाऊ शकतो, असा इशारा युरोपातील अनेक देशांनी पूर्वीही दिला होता. रशियाच्या या निर्णयामुळे या देशामधील लोकांचे किती हाल होतील, याची जराही चिंता रशियाने केलेली नाही, अशी टीकाही झेलेन्सकी यांनी केली आहे. रशियाच्या निर्णयानुसार बुधवारपासून युरोपाचा गॅस पुरवठा खंडीत केला जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.