पदभार घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही घोषणा
मुंबई : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पदावरुन जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना विश्वासात घेऊन राज्याची पुढची वाटचाल करणार असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देण्यात येईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश अशा राज्याच्या सर्वच भागांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका व राज्याचा विकास या अजेंड्यावर राज्याची पुढील वाटचाल असेल, असेही श्री.शिंदे पुढे म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक-पाणी, जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प आदी विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समृद्धी महामार्ग राज्याचा गेमचेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी सुरु केलेली जनहिताची कामे पुढे नेण्यात येतील, असेही ते म्हणाले.
पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही शेवटी मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दुप्पट वेगाने कामे मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, उपाध्यक्ष महेश पावसकर, सचिव प्रमोद डोईफोडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.