Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानूसारच साजरा करा - डॉ. राजा दयानिधी

 नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानूसारच साजरा करा   - डॉ. राजा दयानिधी


- वनविभागाच्या 125 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती

- सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाकडून 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती


सांगली, दि. 29,  : कोरोना कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी सणाचे आयोजन होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. नियोजनात प्रत्येक बाबींची सुक्ष्म पध्दतीने आखणी करावी. त्यासाठी आवश्यक नोडल अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी. वन विभाग, पोलिस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांनी हा सण शांततेत व सुरळीत पार पडेल याबाबतची सर्वोतोपरी दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल तेथे जिल्हा प्रशासनाची तातडीने मदत घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात नागपंचमी सण आयोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसिलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) डॉ अजित साजणे, शिराळा पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रविंद्र होरा, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड आदि उपस्थित होते.

कोरोनाचे सर्वच निर्बंध शिथील झाल्यानंतर नागपंचमीचा सण साजरा होत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार नागपंचमी सणासाठी नियोजन करावे, असे आदेशित करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, शिराळा नगरपंचायतीने तातडीने साफसफाई करण्यावर भर द्यावा. तसेच साथरोग पसरू नये याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होईल याचे नियोजन करावे. तसेच फायर ब्रिगेड, रूग्ण वाहिका यांची उपलब्धता ठेवावी. आवश्यकता भासल्यास ही अत्यावश्यक वाहने येण्याजाण्यासाठी रस्ते मोकळे राहतील याचेही नियोजन करावे. गर्दीमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील अशांसाठी कोरोना तपासणी पथक तैनात ठेवावे. त्याचबरोबर आवश्यक औषधांचा साठा, सर्प दंशाची लस उपलब्ध ठेवावी. प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, जनजागृतीपर उपक्रमांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करावी. तसेच भाविकांना आवश्यक असणाऱ्या सूचना, मार्गदर्शन यांचे फलक लावण्यात यावेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही अद्ययावत ठेवावेत. भाविकांच्या सोयीसाठी सूचना प्रसारीत करण्यासाठी लाऊडस्पीकरचे नियोजन करावे. सणाच्या अगोदर सणाच्या आयोजनाबाबतची दवंडी संबंधित प्रभागामधून देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने 125 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 10 गस्ती पथके तयार केली असून या पथकात 8 जणांची नियुक्ती केली आहे. तसेच 7 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शिराळा नगरपंचायतीतील 32 गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे.  आरोग्य विभागाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच अत्यावश्यक बाबींसाठी उपजिल्हा रूग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात येणार आहेत. पोलिस विभागाच्या माध्यमातून 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये एक पोलिस उपअधिक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 60 महिला अंमलदार, 44 वाहतूक शाखेतील कर्मचारी तर 330 पुरूष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून 16 व्हीडिओ कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येणार असून ध्वनी मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 12 ध्वनीमापक यंत्रे तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाहतूकीचेही नियोजन करण्यात आले असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.