Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिला रोज येऊन बसायची.

जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिला रोज येऊन बसायची.


जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिला रोज येऊन बसायची. ही बाब जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि त्यांची समस्या विचारली. त्यावर त्या महिलेने 'जमीन विक्री साठी मंजुरी हवी आहे.' असे सांगितले. 

जिल्हाधिकारी साहेबांनी त्या महिलेची कागदपत्रे तपासली त्यावरून त्यांना लक्षात आले की, स्वतः राज्यमंत्री असलेली ही महिला सामान्य नागरिकाप्रमाणे कार्यालयात येत आहे. या अगोदर ३ वेळा मंजुरी दिली असतानाही त्यांना तांत्रिक कारणामुळे जमीन विकता आली नाही. कारण विचारले असता, "पहिल्यांदा माझा मुलगा वारला म्हणून काही तांत्रिक अडचणी आल्या, दुसऱ्यांदा विकायची वेळ आली तेव्हा पती वारले आणि तिसऱ्यांदा जमीन विकायला काढली तेव्हा दुसरा मुलगा वारला. आता घरात कर्ता पुरुष कोणीच नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यासाठी ही जमीन विकणे गरजेचे आहे." त्यांच्या या वाक्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन कामाला लागले. तांत्रिक अडचणी येऊन एका मंत्र्याला असा अनुभव येत असेल तर सामान्यांची काय व्यथा असेल? या प्रसंगानंतर ओडिसा राज्याचे संपूर्ण व्यवस्थापन आणि प्रक्रिया बदलल्या, हे वेगळे सांगायला नको!

ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती दौपदी मुर्मु या आहेत.

या एका प्रसंगातून आपल्याला त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळतात. 

१. मंत्री असूनही आपले सामान्यपण जपत, ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुरुप काम करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व!

२. आपल्या घरातील बिकट परिस्थिती असतानाही मंत्रीपदाचा गैरवापर केला नाही. कर्जासाठी जमीन विकली पण  अनुचित मार्गांचा वापर केला नाही, असे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व!

३. प्रशासनाला कसे शिकवावे याचा कृतीतून आदर्श घालून दिला. कृतीतून व्यवस्थापन बदलून दाखवणाऱ्या आदर्श प्रशासक!

आदर्श शिक्षिका, आदर्श राजकारणी, आदर्श मंत्री आणि आदर्श राज्यपाल या भूमिकांनंतर आता राष्ट्रपती पदाची नवी जबाबदारी देखील अशाच आदर्श पद्धतीने त्या सांभाळतील, हे निश्चित!

अतुल चव्हाण

- मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.