Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंमली पदार्थांच्या वापर व निर्मितीला आळा बसण्यासाठी कारवाई करण्याबाबतचा ॲक्शन प्लॅन तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

अंमली पदार्थांच्या वापर व निर्मितीला आळा बसण्यासाठी कारवाई करण्याबाबतचा ॲक्शन प्लॅन तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



सांगली, दि. 6, : जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वापर व निर्मितीला आळा बसावा,    तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित क्षेत्रात अवैधपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर धडक कारवाई करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी ॲक्शन प्लॅन तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एन.सी.ओ.आर,डी. समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम. मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे, वाळवा प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, विटा प्रांताधिकारी संतोष भोर, कडेगाव प्रांताधिकारी गणेश मरकड अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक अतूल औंधकर, अन्न औषध विभागाच्या सहायक आयुक्त  सपना कुपेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक ऋषीकेश इंगळे, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर आळा घालण्यासाठी कायद्याची कडक अंमलबाजावणी करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार जिल्याीषमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री यावर कडक कारवाई करण्यासाठी सर्व विभागांनी कारवाईची मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत नियोजन करावे, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अंमली पदार्थ विक्री, उत्पादन याबाबत तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात यावी.  8 वी पासूनच्या पुढील शाळा व महाविद्यालये यांच्या 100 मिटर च्या आतील प्रतिबंधीत क्षेत्रात अवैधपणे विक्री करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याबाबत संबंधित  विभागांनी पुढाकार घ्यावा. उत्पादन करणाऱ्याला दोन वर्षापर्यंत शिक्षा व 5 हजार रूपये इतका दंड तर विक्री करणाऱ्याला 1 वर्षापर्यंत शिक्षा व 1 हजार रूपयापर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे त्यांनी यावेळी आदेशीत केले.

अंमली पदार्थाच्या तस्करी तसेच वाहतुकीबाबत पोलीस विभागाने लक्ष ठेवावे. जिल्ह्यात खसखस (अफू) व गांजाच्या बेकायदेशीर लागवडीवर लक्ष ठेवणे, आंतरराज्य व आंतरजिल्हा अंमली पदार्थ यांचा तपास करण्यात यावा. त्यासाठी पोलिस व अन्य संबंधित विभागाने कार्यवाही करावी. अंमली पदार्थ गैरवापराविरूध्द प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदी आणि औषधाच्या हानीकारक प्रभावाबद्दल बेकायदेशीर लागवडीमुळे प्रभावित झालेल्या प्रदेशामध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या ठिकाणच्या अवैध लागवडीमुळे प्रभावित भागात पर्यायी विकास कार्यक्रम राबविण्यावर भर द्यावा, असे सांगून अंमली पदार्थ व औषधे शोधण्यासाठी उपकरणाच्या आवश्यकतेचे मुल्यांकन करणे आणि त्यासाठी आवश्यक साधन सामग्रीससाठी संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसन केंद्रही सक्षम करण्यासाठी यंत्रणांनी भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.

पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, एनडीपीएस कायद्यांतर्गत सन 2021 मध्ये 44 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 61 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 94.336 किलोग्रॅम गांजा व 272.610 ग्रॅम काकेन असा 35 लाख 90 हाजर 584 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच सन 2022 मध्ये आत्तापर्यंत 23 गुन्हे दाखल करून 26 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 8 लाख 90 हजार 655 रूपये किंमतीचा 77.990 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पोलिस विभाग सतर्क असून अवैध तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचे सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.