Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात कोट्यवधी रुपयांचे कोकेन, एमडी पावडर जप्त; नायजेरियन जोडपे जेरबंद

पुण्यात कोट्यवधी रुपयांचे कोकेन, एमडी पावडर जप्त; नायजेरियन जोडपे जेरबंद


पुणे शहर परिसरात एमडी पावडर (मेफ्रेड्रॉन), कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन पती – पत्नीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. बाणेर येथे केलेल्या या कारवाईत दोघांकडून तब्बल 96 लाखांचे मॅफ्रेड्रॉन, 30 लाखांचे कोकेन व मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा तब्बल 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

उगुचुकु इम्यॅनुअल (43), ऐनीबेली ओमामा व्हिवान (30, रा. दोघे. नालंदा गार्डन रेसीडेन्सी, बाणेर, मूळ. रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उगुचुकु आणि ऐनीबेली हे पती – पत्नी असून नायजेरीयाचे रहिवासी आहेत. 2018मध्ये देखील उगुचुकु याच्यावर ड्रग्जविक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेर भागात राहत्या घरातून एमडी पावडर, कोकेन अशा अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

यानुसार सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने बाणेर भागात सापळा रचून उगुचुकु आणि ऐनीबेली यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता 96 लाख 60 हजार रुपये किमतीचे 644 ग्रॅम एमडी पावडर, ३० लाख 16 हजारांचे 201 ग्रॅम कोकेन, 2 लाख 16 हजारांची रोकड तसेच मोबाईल इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा तब्बल 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाज मिळून आला. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आरोपींनी कुणाकडून आणले, याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून तपास सुरू आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.