ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार
मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये होत आहे.
हैदराबाद हा AIMM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला आहे. या बैठकीच्या निमित्तानं ओवेसी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. भाजपाच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तब्बल 18 वर्षांनी हैदराबादमध्ये बैठक होत आहे.
या बैठकीच्या नंतर विजय जनसंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाने कर्नाटकनंतर तेलंगणा या दक्षिण भारतामधील राज्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विजय जनसंकल्प सभेच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या कारभाराला भाजपाकडून लक्ष्य केले जाईल. स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीमध्ये पक्षाच्या असलेल्या योगदानाचीही पंतप्रधान या सभेत आठवण करून देतील, असं मानलं जात आहे. तेलंगणामध्ये 2023 साली विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यात स्वबळावर सत्तेमध्ये येण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.