Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा न्यायालयासमोरचा रस्ता बनतोय जीवघेणा

 जिल्हा न्यायालयासमोरचा रस्ता बनतोय जीवघेणा


सांगली जिल्हा न्यायालयासमोरील होळकर चौकातून ( विजयनगर चौकाकडून )  न्यायालयाकडे जाणारा रस्ता जीवघेण्या स्वरूपाचा बनत चालला असून महापालिका प्रशासनाने तात्काळ ठिकाणी योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी वकील वर्गातून तसेच नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

सांगली जिल्हा न्यायालयासमोरील सांगली-मिरज रस्त्यावरील होळकर चौकाकडून सांगली जिल्हा न्यायालयाकडे जाणारा रस्त्यावरून न्यायालयातील सर्व न्यायाधीश महोदय, सध्या कोथळे खून खटल्यासाठी येणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून न्यायालयात जाणारे वकील, कर्मचारी, अनेक मंत्री, राजकारणी लोक, नागरिक शाळेची वाहने , रुग्णवाहिका आदी अनेक लोक याठिकाणी ये जा करीत असतात. मात्र मुख्य चौकातून न्यायालयाकडे जाणारा रस्ता  हा अरुंद स्वरूपाचा आहे त्यातच त्या रस्त्यात बॅरिकेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना न्यायालयाकडे वळून जाताना कसरत करत जावे लागते. शिवाय न्यायालयाकडून विजयनगर चौकाकडे जाताना असलेल्या रस्त्यालगत मोठा नाला आहे. 


हा रस्ता मुख्य चौकालगत वळणालाच खचला आहे. त्यामुळे येथून जात असताना आत्ता पर्यंत काही वाहनांचे अपघात जात असल्याचीही चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळत आहे. न्यायालयासमोरील रस्त्यावरून विजयनगर चौकाकडे जाताना त्या ठिकाणी असलेल्या बॅरिकेट मुळे पहिलाच रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे , त्यातच वळणावर खचलेल्या रस्त्याजवळून कार किंवा मोठी वाहने जाताना चुकून साईड पट्टी जवळ रस्ता खचला तर शेजारी असलेल्या खोल आणि मोठ्या उघड्या स्वरूपाच्या नाल्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची साईड पट्टी कधीही खचण्याची शक्यता असल्याने न्यायाधीशांची वाहने, विशेष सरकारी वकील, राज्यभरातून येणारी वकील मंडळी, पोलीस वाहने, प्रशासन अधिकारी, स्कुल बसेस, रुग्णवाहिका , ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी असे अनेक जण इथून जीव मुठीतच घेऊन जाताना आढळून येत आहेत. 

येथून जवळच जिल्हाधिकारी कार्यालय आहे, अनेकवेळा जिल्हाधिकारी येथून कामानिमित्त जात असतात, महापालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, पोलीस अधिकारी कामानिमित्त न्यायालयात येत असतात. असे असूनही ह्या अत्यंत धोकादायक बनलेल्या रस्त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही असेच म्हणावे लागेल. सांगली वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले. ह्याबाबत महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या बाबतीत तात्काळ लक्ष देणे गरजेचे असून पुढील संभाव्य घटना टाळणे आता प्रशासनाच्याच हातात आहे. या जीवघेण्या रस्त्याबाबत तात्काळ ठोस पाऊले न उचलल्यास नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही समजते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.