रात्रीच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं, सकाळी लगेच हकालपट्टी कशी काय? आढळरावांचा सवाल
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांनी नविर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. ही फेसबुक पोस्ट पक्षविरोधी असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावरुन सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती असे शिवाजीराव आढळराव म्हणाले.
नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा' अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. हिच पोस्ट आढळरवांना भोवली आहे. या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात तसं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे की बंडखोर एकनाथ शिंदे अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्यांना यातून कारवाईचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे आढळरावांची फेसबुक पोस्ट ही पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अगदी आज सकाळीच हे वृत्त समजल्याने आढळरवांना देखील धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंना याची कल्पना नसावी
काल रात्रीच उद्धव ठाकरेंशी आढळराव पाटील यांचे फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावरुन सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती, अशी पहिली प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. पण अधिकचं बोलण्यास त्यांनी नकार दिला. शनिवारी रात्री फोनवरुन झालेल्या संभाषणात, जिल्ह्यातील काही पदाधिकारी आपणास रविवारी भेटायला येणार आहेत, याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली. त्यावेळी मला फेसबुकवरील शुभेच्छांबद्दल उद्धव ठाकरेंनी विचारलं. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना मी फक्त शुभेच्छा दिल्याचं स्पष्टीकरणही त्यांना दिलं. शिवाय मंगळवार अथवा बुधवारी मुंबईत भेटायचंही आमचं ठरलं. मग काही तासातच माझी पक्षातून हकालपट्टी कशी काय होऊ शकते? बहुदा असं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलं आहे. याची कल्पना स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नसावी, असंही आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.
पुण्यात झालेल्या मेळाव्यात आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
पुणे जिल्ह्यात खासकरुन शिरूर लोकसभेत आढळरावांचे मोठे प्रस्त आहे. इथून सलग तीन वेळा ते खासदार झाले आहेत. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार झाले. नवख्या उमेदवारानं केलेला पराभव आढळरावांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या आणि राज्यात महाविकासआघाडीच अभूतपूर्व सरकार स्थापन झालं. तेव्हापासून आढळराव आणि राष्ट्रवादीतील शितयुद्ध अनेकदा पाहायला मिळालं. शिरुर लोकसभेतील वारंवार महाआघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली. अशातच एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केली. या कठीण काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमतानं उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिली. मात्र, पक्षातीलच नेते उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत होते. म्हणूनच राज्यभर मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शिरुर लोकसभेत पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिरांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात आढळरावांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधी सूर कायम ठेवला. त्यामुळं आढळरावांच्या हकालपट्टी मागे केवळ फेसबुक पोस्ट हे एकमेवच कारण आहे का? असा प्रश्न देखील विचारला जातोय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.