Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म्हैसाळ हत्याकांड मांत्रिकाच्या घरातून नारळ, कवड्या, सुसाईड नोटस जप्त

म्हैसाळ हत्याकांड मांत्रिकाच्या घरातून नारळ, कवड्या, सुसाईड नोटस जप्त


पैशाच्या तगाद्यामुळेच हत्या केल्याचे निष्पन्न जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांची माहिती


सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आली आहे. दि. २० जून रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान, धीरज सुरवशे यांना अटक करण्यात आली आहे. मांत्रिक बागवान याच्या घरातून काळ्या धाग्यात बांधलेले नारळ, पांढऱ्या कवड्या, वनमोरे कुटुंबियांनी लिहिलेल्या सुसाईट नोटसच्या झेरॅक्स, वनमोरे यांनी दिलेले कोरे चेक जप्त करण्यात आले आहेत. गुप्तधन काढून देण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानेच वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

दि. २० जून रोजी डॅ. माणिक वनमोरे, पोपट वनमोरे या बंधूंसह त्यांच्या कुटुंबातील ९ जणांचे मृतदेह घरात आढळून आले होते. मृत्यूपूवीर् त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार २५ सावकारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १९ सावकारांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने मांत्रिक बागवान यानेच वनमोरे बंधूंकडून वेळोवेळी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले. ते पैसे वनमोरे यांनी बागवान याच्या नातेवाईकांच्या खात्यावर भरल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान शुक्रवारी सांगली पोलिसांच्या पथकाने सोलापूर येथे बागवान याच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे काळ्या धाग्यात बांधलेले नारळ, पांढऱ्या कवड्या, वनमोरे कुटुंबियांनी लिहिलेल्या सुसाईट नोटसच्या झेरॅक्स, वनमोरे यांनी दिलेले कोरे चेक सापडले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत.

 वेळोवेळी पैसे देऊनही बागवान याने गुप्तधन काढून न दिल्याने वनमोरे यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यानंतर दि. १७ जूनरोजी बागवान त्याचा साथीदार सुरवशे याच्यासोबत म्हैसाळ येथे आला होता. त्यावेळी त्याने तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची नावे लिहून द्या, पूजा करायची आहे असे म्हणून त्यांच्याकडून सुसाईड नोट लिहून घेतली. त्यानंतर दि. १९ रोजी रात्री बागवान आणि सुरवशे एका कारमधून म्हैसाळमध्ये आले. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना टेरेसवर पाठवले. नंतर एकेकाला खाली बोलावून त्यांना विषारी औषध पिण्यासाठी दिले. 

दोन्ही कुटुंबातील नऊजण मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघेही सोलापूरला निघून गेले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॅल डिटेल्स तपासून कारवाई करण्यात आल्याचे गेडाम यांनी सांगितले. जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम यांच्या मागर्दशर्नाखाली उपअधीक्षक अशोक वीरकर, एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, संदीप नलवडे, चेतन महाजन, सागर टिंगरे, संदीप पाटील, आयर्न देशिंगकर, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.