Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती

 द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती


उत्तम शिक्षिका ते भारताच्या राष्ट्रपती हा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ओडिशातील एका शहराच्या नगरसेविका आता देशाची प्रथम नागरिक होतेय. आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती एवढीच द्रौपदी मुर्मू यांची ओळख मर्यादित नाही.

जीवनामध्ये अनेक चढउतार, नैराश्य, त्या नैराश्यावर यशस्वीपणे केलेली मात हा त्यांचा जीवनप्रवास कुणालाही प्रेरणा देईल असाच आहे. आपण कधीकाळी राजकारणात येऊ, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

कारकुनी ते प्राध्यापक

1979मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला कॉलेजमधून पदवी घेतली. त्यांची पहिली नोकरी होती राज्य सरकारच्या सिंचन विभागात. पण कारकुनीमध्ये मत रमलं नाही आणि त्या मयूरभंजमधील कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापिका झाल्या. 1997 साली त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मयूरभंजच्या रंगरायपूर वॉर्डातून त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2 वेळा आमदार आणि 2000 ते 2004 या काळात ओडिशा सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या. 2015मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर त्या मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घ्यायला आल्या. आणखी 5 वर्षांनी आपण देशाच्या प्रथम नागरिक म्हणून याच प्रशस्त महालात येणार आहोत, असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नसेल. पूर्वायुष्यामध्ये कोसळलेले दुःखाचे डोंगर पार केल्यावर त्यांचा जीवनपट अधिकच उजळून निघतो...

दोन मुलांचा मृत्यू आणि नैराश्य

2009मध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला. ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून साधना करत त्यांनी स्वतःला सावरलं. 2013मध्ये रस्ते अपघातात दुस-या मुलाचाही मृत्यू झाला आणि त्याच वर्षी आई आणि सख्ख्या भावाचं निधन झालं.

मात्र दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. 2014मध्ये त्यांच्या पतीवरही काळानं घाला घातला. अध्यात्म आणि योगसाधनेच्या बळावर त्यांनी नैराश्यावर मात केली.

देशाच्या 15व्या राष्ट्रपतींचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. याचाच अर्थ स्वतंत्र भारतात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. 2014मध्ये नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान ठरले होते. आता देशातल्या दोन सर्वोच्च पदांवर स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या व्यक्ती विराजमान झाल्या आहेत.

कणखर नेत्या अशी ओळख

द्रौपदी मुर्मू या रबरस्टँप राष्ट्रपती होतील, असा आरोप होतोय. मात्र झारखंडच्या राज्यपाल असताना भाजपच्याच सरकारनं केलेल्या दोन कायद्यांवर त्यांनी स्वाक्षरी केली नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मुर्मू बधल्या नाहीत. स्वभाव विनम्र आणि तरीही कणखर नेत्या अशी त्यांची ओळख आहे. पुढल्या पाच वर्षांत त्या देशावर आपल्या वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटवतील, याबाबत दुमत नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.