काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत?
मुंबई : शिवसेनेच्या गोटात भूकंपाचे हादरे बसत असतानाच आता काँग्रेसमध्येही धुसपूस सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं होतं. या पराभवाची जबाबदारी मी घेतो असं सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी आता काँग्रेसच्या गटनेतेपदावरुन पायउतार होण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाली. काँग्रेसला ४४ पैकी ४१ पहिल्या पसंतीची मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेसची ३ मतं फुटल्याची माहिती उघड झाली. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल पराभव मान्य करत आमच्याच पक्षाची मतं फुटली तर इतरांना काय दोष देणार असं विधान केलं होतं.
"सरकार म्हणून विचार करण्याची गरज"
"आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
'मविआ'तील नाराजीवर काय म्हणाले थोरात?
शिवसेना, राष्ट्रवादीनं काँग्रेसला मदत केली नाही असं विचारण्यात आलं असता बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही पक्षांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही असं विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आम्हाला मदत केली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण आमच्याच पक्षाची जर मतं फुटत असतील तर इतरांबाबत मी बोलू इच्छित नाही. काँग्रेससाठी नक्कीच हे निराशाजनक आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.