राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत भाजप नेत्यांनी अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राजभवनावर जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. त्यामुळे ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असं विनंती पत्र दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यपाल योग्य निर्णय़ घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फडणवीसांनी दुपारीच दिल्लीत जाऊन अमित शाह आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर थेट इतर भाजप नेत्यांना सोबत घेऊन राजभवनावर गेले.
भाजपने बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. बहुमत सिद्ध करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यपाल चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची आज तात्काळ बैठक बोलावण्यात आली आहे. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगासंबंधी कोर्टात जायचं किंवा पुढे आणखी काय रणनीती आखायची याची खलबतं मविआच्या बैठकीत होणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.