एकनाथ शिंदे 'धनुष्यबाणावर' दावा करु शकतात का? घटना काय सांगते....
ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले की, किती सभासद आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल. आता तरी एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठलाही कायदेशीर आधार नाही. त्यांना आधी इथं येऊन 37 सदस्य त्यांच्याकडे आहेत हे सिद्ध करावं लागेल. आता जो शिवसेना पक्ष आहे तोच शिवसेना आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. हे जर तिथं अपात्र ठरले तर विषयच संपतो.
जर 37 लोकं आले तर त्यांना चिन्ह मिळवावं लागेल. मग खरी लढाई चालू होईल. राष्ट्रपती राजवट लावायची का नाही? मुख्यमंत्री कोण होणार? यात काही भांडणं झाली तर मात्र सुप्रीम कोर्टाकडे निर्णय जाईल, असं उल्हास बापट म्हणाले. उल्हास बापट यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदेंना त्यांचा गट हाच शिवसेना आहे, हे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळवावच लागेल. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. आयोगाकडून चिन्ह मिळण्यासाठी वेळ लागेल. एक- दोन दिवसांत हे होणारे नाही.
एकनाथ शिंदेंना 37 पेक्षा अधिक आमदार सोबत ठेवावे लागतील. त्यापैकी काहींनी जरी भूमिका बदलली तरी ते डिसक्वालिफाय होतील. सध्या शिवसेनेत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला प्रतोदच ग्राह्य धरण्यात येईल. एकनाथ शिंदे आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना देऊन सरकार बरखास्तीची मागणी करु शकतात. पण राज्यपाल सरकार बरखास्त करु शकणार नाहीत. त्यांना फ्लोअर टेस्ट घ्यावीच लागेल. जोपर्यंत एखादे सरकार फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत गमावत नाही तोपर्यंत त्या सरकारने बहुमत गमावले आहे असे मानले जात नाही. हे सायकॉलॉजिकल वॉरफेअर आहे, असं बापट यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.