Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच : रामदास कदम

मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच : रामदास कदम


शिवसेनेचे नेते रामदास कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच काय तर रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा देखील रंगलेल्या. मात्र पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे वक्तव्य रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना राम कदम पूर्णविराम दिला आहे.

रामदास कदम म्हणाले, मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत सेनेसोबतच असणार आहे. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला रामदास कदम अनुपस्थित होते. याविषयी विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना तुर्तास अभय देण्यात आल्याचं कळतंय. त्यांच्यावर सध्या कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. पण दुसरीकडे शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. बंडखोरांना सोमवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत म्हणणं मांडण्याचं नोटीसीत म्हंटलंय.

रामदास कदम हे 2005 ते 2009 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून रामदास कदमांना महाराष्ट्र ओळखायचा. 2005 मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा 2009 मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचं काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 

2010 मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016 मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. 2019 मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे. 2019 मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि रामदास कदम बाजूला पडले. ते आता पक्ष सोडण्याच्या मानसिकतेपर्यंत आले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.