सोनिया गांधी आणि शरद पवारांशी चर्चा; उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता!
मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या राजकीय संघर्षात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचलेला आहे. बंडखोर आमदार काही केल्या ऐकायला तयार नाहीत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आग्रह बंडखोर आमदारांनी केला आहे. आठवडाभरानंतरही शिवसेनेचे सर्व प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. यातच आता सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
कॅबिनेट बैठकीला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
महाविकास आघाडी सरकारची एक कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहत आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामाही देऊ शकतात, अशी दाट शक्यता असल्याची चर्चाही सुरू झालेली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, भाजपच्या बैठकींचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट घेतली. गेल्या काही दिवसांत अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे भाजपही राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.