Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काजू बोंडे, मोहफुलाच्या मद्याला ‘विदेशी’चा दर्जा!

 काजू बोंडे, मोहफुलाच्या मद्याला ‘विदेशी’चा दर्जा!

 

राज्य शासनाचा निर्णय ः मद्यार्काचे मिश्रण करण्यास बंदी

सांगली : काजूची बोंडे आणि मोहाची फुले यापासून तयार करण्यात येणार्‍या मद्याला आता विदेशी मद्याचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे पदार्थ, फळे, फुले यांपासून तयार होणार्‍या मद्यालाही विदेशी मद्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्याला स्थानिक मद्य असे संबोधण्यात येणार असल्याचेही शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.    

स्थानिक पातळीवर पदार्थ, फळे, फुलांपासून तयार होणार्‍या मद्यार्काला नमुना आय अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येणार आहे. अशा अनुज्ञप्तीकडून योग्य ते शुल्क आकारण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर तयार होणार्‍या मद्यार्कासाठी पीएलएल अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर कमी प्रमाणात मद्यार्क निर्मिती झाल्यास त्यामध्ये दुसर्‍या फळा, फुलांपासून तयार होणारे मद्यार्क मिश्रण (ब्लेंडिंग) करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र फळे, फुलांपासून तयार होणार्‍या मद्यार्कामध्ये कोणत्याही परिस्थितीत मळी, धान्याधारित मद्यार्काचे मिश्रण करता येणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.      

पीएलएल अनुज्ञप्त्यांना किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री दुकानाची अनुज्ञप्ती असणे बंधनकारक असणार नाही. काजू बोंडे, मोहाची फुले, स्थानिक पदार्थ, फळे, फुले यांपासून तयार झालेले मद्य सर्व वाईन शॉप, बिअर शॉपी, बिअर बारमध्ये विक्रीस परवानगी दिल्याचेही या आदेशात म्हटले आहे. स्थानिक पदार्थांपासून मद्यार्क निर्मितीसाठीच्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेमार्फत द्याव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.    

काजू बोंडे, मोहाची फुले, अन्य फळे, फुलांपासून तयार होणार्‍या मद्याला विदेशीचा दर्जा दिल्याने आदिवासी भागासह काजू उत्पादित प्रदेशातील शेतकर्‍यांना चांगलाच फायदा होणार आहे. त्यांना थेट मद्य निर्मितीची परवानगी मिळणार असल्याने त्यांची आर्थिक उन्नती साधणे शक्य होणार आहे. शिवाय अशा मद्य निर्मितीसाठी परवानगीच्या प्रक्रियाही सुलभ केल्याने आदिवासी बहुल तसेच काजू निर्मिती क्षेत्रात असे मद्यार्क निर्मितीचे कारखाने वाढण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.