Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गांधीजन चरित्र ग्रंथ माला मौलाना आझाद यांच्यावर नंदूचे पुस्तक

गांधीजन चरित्र ग्रंथ माला मौलाना आझाद यांच्यावर नंदूचे पुस्तक



मनोविकास प्रकाशन आलीकडे एकाहून एक सुंदर ग्रंथ वाचकांसमोर ठेवत आहे. या टीमने नुकतेच महात्मा गांधींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर चरित्र ग्रंथमाला प्रकाशित केली आहे. सानेगुरुजी, विनोबा भावे, पंडित नेहरू, खान अब्दुल गफार खान, सरोजिनी नायडू आणि मौलाना आझाद या सहा व्यक्तिरेखांचे जीवन आणि कार्य मुलांना समजेल अशा भाषेत मनोविकास ने आणले आहे ही मोठीच कामगिरी.  यासाठी महाराष्ट्रातील आपल्या स्वत:च्या शैलीने लिहिणाऱ्या लेखकांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याकडून हे लेखन करून घेण्यात आले. 

आपल्या सर्वांचे मित्र नंदू गुरव यांच्यावर मौलाना आझाद यांचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी घेतल्यानंतर मौलाना आझाद यांच्या विषयी माहिती संकलित करण्याची नंदूची प्रचंड धडपड मी बघत होतो. काही केल्या कोठेच मौलाना आझाद यांची माहिती मिळत नव्हती. सारा सोशल मीडिया, पुस्तके चाळून चाळून नंदूने ही माहिती गोळा केली आणि आपल्या शैलीत त्याने हे चरित्र लेखन केले. 

नंदू गुरव याचे लेखक म्हणून हे पहिलेच पुस्तक आणि तेही मनोविकास प्रकाशनने प्रसिद्ध केले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.  त्याचे कधी ना कधी एखाद्या मोठ्या प्रकाशनाकडून पुस्तक येणार हे माहीत होतेच. पण ते अशा मोठ्या चरित्रमालेचा भाग बनून येईल, असे मनातही आले नव्हते. इतर चरित्र लेखक आणि त्यांचे वय पाहता त्या सर्वात लहान असणार्या नंदूच्या वाट्याला सगळ्यात अवघड पेपर आला होता. पण त्याने तो 100% गुणांसह सोडवला आहे. मौलाना आझाद यांचे चरित्र वाचताना माझ्या लक्षात आले की, आपल्याला यातील कितपत माहिती होती? बहुतेक नव्हतीच. लहानपणी शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक आले तेव्हा, मजेने तेलकट खडू वापरून जे थोर चेहरे विद्रूप करण्याचा उपद्व्याप केला होता त्यातील विद्रूप करायला सगळ्यात अवघड गेलेले चित्र ही कलामांची पहिली ओळख. 


पुढे सर्वात कमी वयाचे पत्रकार म्हणून मनात निर्माण झालेली ओळख, पंडित नेहरू यांच्याविषयी वाचताना किंवा भारतातील काही जटिल प्रश्नांवर काही लेख वाचताना त्यामध्ये आलेले संदर्भ, दंगली, परदेशात विशेषतः मुस्लिम राष्ट्रात नेहरूंच्या बरोबर गेलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल वाचनात आलेला थोडाफार मजकूर सोडला तर मौलाना आजाद यांच्याविषयी फारशी माहिती माझ्याही वाचनात नव्हती. नंदूच्या पुस्तकाने आश्चर्यचकित झालो आहे. या चरित्र मालेतील इतर व्यक्तिरेखांविषयी खूप संदर्भ सापडतात. त्यांच्या विचारांची योग्य संगतवार लावणारे आणि कार्याला उजाळा देणारे इतर ग्रंथ जितके वाचनीय आहेत, त्याहूनही मला नंदूचा मौलाना आझाद यांच्यावरील ग्रंथ खूप मोलाचा वाटतो. कारण मराठीत इतकी माहिती, तीही सोपी करून नंदूने आपल्या समोर ठेवली आहे. 

या गांधीजनांना जाणून घेण्याची हीच वेळ आहे आणि आपला मित्र या चरित्र मालेतील एका ग्रंथाचा लेखक आहे, म्हणूनही मला ते ग्रंथ आपलेसे वाटतात. आपण ही वाचा आणि आपल्या मुलांना भेट द्या. अशी पुस्तके आणि असा विचार या मुलांच्या मनात रुजण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यातून त्यांच्या जीवनाला केवळ दिशा मिळेल असे नव्हे तर त्यांच्या आयुष्यभरासाठी हा विचारांचा ठेवा त्यांना मानवतेच्या मार्गावरुन ढळू देणार नाही. कोणत्याही अफवेने त्यांचे मस्तक भडकणार नाही. त्यांची कृती आततायी असणार नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.