छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच केला अंत्यविधी
नेवासा : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी येवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवार (दि.२०) रोजी गेवराई (ता.नेवासा) येथे घडली आहे. संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेचा मृत्युदेह चक्क सासरी जावून विवाहितेच्या घरासमोर अंत्यसंस्कार केला.
याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात मृतक विवाहितेच्या पतीसह सासु – सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे, की गेवराई (ता.नेवासा) येथील नानासाहेब कर्डिले यांच्या मुलीचे लग्न सामनगांव (ता.शेवगांव) येथील सुधीर सुरेश कापरे याच्याशी दोन महिण्यापुर्वी झाले होते. लग्नात ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात नवरदेवाला पाच लाख रुपये, सहा तोळे सोन्याचे दागिने दिलेले होते.
दरम्यान हुंड्याचे राहिलेले एक लाख 75 हजार, सोनाराचे पैसे व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे दिले नाहीत, म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. तसेच मृतक विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.
या त्रासाला कंटाळून विवाहितेने माहेरी येऊन विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान या विवाहित मुलीचा मृत्यू झाला. नेवासा पोलीस ठाण्यात मुलीची आई अर्चना नानासाहेब कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेची सासु मुक्ताबाई कापरे, सासरा सुरेश कापरे, नवरा सुधीर कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मृतक विवाहितेचा मृत्युदेह तिच्या सासरी नेवून सासरच्या दारातच अग्निडाव देवून संताप व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.