Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेश्यालयात जाणे ग्राहकांचा गुन्हा नाही, कलकत्ता हायकोर्टाने केले स्पष्ट

 वेश्यालयात जाणे ग्राहकांचा गुन्हा नाही, कलकत्ता हायकोर्टाने केले स्पष्ट


कोलकाता : केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणारा ग्राहक अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी जबाबदार धरला जाऊ शकत नाही, असा निकाल कलकत्ता हायकोर्टाने दिला आहे. ४ जानेवारी २०१९ रोजी एनआरआय व्यावसायिक सुरेश बाबू एका मसाज सेंटरमध्ये गेले होते. या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकला. 

बाबू, आणखी एक पुरुष व ८ महिलांना छाप्यात पकडण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी वेश्यागृह चालवणे, व्यावसायिक हेतूने लैंगिक शोषण आणि वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईवर गुजराण केली म्हणून त्यांच्या विरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवत पोलिसांनी या सर्वांना अटक केली. पुढे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. बाबू यांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर बाबूंनी केस रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. 

व्यावसायिक हेतूने एखाद्या व्यक्तीचे लैंगिक शोषण करणे, त्यास उपजीविकेचे साधन बनवणे आणि आपल्या जागेचा वापर वेश्यालयासाठी करण्याची परवानगी देणे हे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र गुन्हे आहेत. ग्राहकाचा समावेश यामध्ये होत नाही. वेश्यागृहात ग्राहक म्हणून जाणे हे वारांगनांच्या कमाईवर जगणे ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाने गुन्हा रद्द केला.

यापूर्वीचा काय आहे निर्णय?

यापूर्वी एप्रिल २२ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय आणि मे २२ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायातील ग्राहकास अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी करता येत नाही असा निर्णय दिला आहे.

१ एखादा ग्राहक वेश्याव्यवसायाला अक्षरशः प्रोत्साहन देऊ शकतो आणि पैशासाठी वारांगनांचे शोषणही करू शकतो. परंतु याबाबतीत कोणताही विशिष्ट आरोप आणि ठोस पुरावा नसताना, ग्राहकावर कारवाई करता येत नाही.

२ पैशांच्या बदल्यात लैंगिक उपभोग घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपी करता येत नाही.

-न्यायमूर्ती अजॉय कुमार मुखर्जी

यापूर्वी न्यायालयांनी वेश्यालयातील महिला या स्वत: बळी आहेत म्हणून त्यांना कारवाईतून सूट दिली आहे. आता ग्राहकांनाही दिलासा देणाऱ्या निर्णयानंतर फक्त दलाल व जागा मालक हे कारवाईस पात्र ठरतील.

-सिद्धेश्वर ठोंबरे, ज्येष्ठ ॲडव्होकेट, औरंगाबाद


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.