मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांच्या ट्वीटनं खळबळ
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेत वादळ उठलं.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, *"महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट अत्यंत बोलकं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे, असं भाष्य केलं होतं. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी विधान बरखास्तीचं ट्वीट केलं आहे.
शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल संजय राऊत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे." आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना "शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे." असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.