शंभर कोटींपेक्षा जास्त पैशांचे आमिष दाखविले, पण मी गेलो नाही कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
बंडखोरांनी आपल्यालाही शंभर कोटींपेक्षा जास्त पैशांचे आमिष दाखविल्याचा गौप्यस्फोट कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत केला. राजपूत यांच्या या गौप्यस्फोटाने बंडखोरांच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीतून कामे सुरू आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करून मी गावी परतत होतो. त्यावेळी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी मला मोबाईल बंद ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार मी माझा मोबाईल बंद केला. गावाजवळ येताच मोबाईल सुरू करताच मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावरून आणि मातोश्रीवरून संपर्क साधण्यात आला. तातडीने बैठकीला बोलावण्यात आले.
दुसऱ्या दिवशी मी मुंबईत बैठकीला पोहोचलो. मलाही वेगवेगळ्या व्यक्तींकडून आमिष दाखविण्यात आले. माझ्याकडे दोन गाड्या भरून पैसे आले. पण मी त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे पर्यावरणमंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मला शंभर कोटीच काय त्यापेक्षाही जास्त कोटींचे आमिष दाखविण्यात आले, असा गौप्यस्फोट उदयसिंग राजपूत यांनी केला. अशी कितीही आमिषे दाखविली तरी मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.