एकनाथ शिंदेनी ठेवले 'हे' तीन प्रस्ताव, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीनंतर शिंदेंनी तीन प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे शिवसेना नेते सुनील बागुल यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्ही शिवसैनिक सरसेनापती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. काय म्हणाले सुनील बागुल?
सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर
एकनाथ शिंदे शिवसेनेला चांगलेच महागात पडले असून यामुळे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात प्रामुख्याने शिवसेनेने गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंना बाजूला केले असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची वर्णी लागली. यासोबत अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात महत्वाच्या शहरात शिवसेना रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला शिवसैनिकांचा पूर्ण पाठिंबा असून यासाठी नाशिकमध्ये देखील शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुनील बागुल यांनी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीनंतर गौप्यस्फोट केला आहे.
शिंदे यांनी तीन प्रस्ताव ठेवले
सुनील बागुल म्हणाले की, शिंदे आणि नार्वेकर यांची बैठक नुकतीच पार पडली असून शिंदे यांनी तीन प्रस्ताव ठेवले आहेत. यामध्ये गटनेतेपद पुन्हा माझ्याकडे द्यावे, काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत युती तोडावी, तसेच भाजप सोबत युती करावी' असे महत्वाचे तीन त्यांनी दिल्याने बागुल म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसैनिक एकत्र आले असून शक्तिप्रदर्शन करीत आहेत. शालिमार येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र झाले होते. तत्पूर्वी मध्यवर्ती कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील संघटनांची बैठक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत आम्ही सर्व शिवसेनेच्या पाठीशी असल्याची घोषणाबाजी करण्यात आली. 'शिवसेना जिंदाबाद, ताकद कोणाची शिवसेनेचीच', अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
..आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी - एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारला आहे. हे आमदार पहाटे सुरतमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चाही झाल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात?
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.