सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील योजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही बोलावली आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यांनी खास प्लान तयार केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहेत.
राज्यात सुरु असलेले राजकीय संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तातडीची बैठक बोलावली आहे. 16 आमदारांच्या निलंबनानंतरच्या परिस्थितीवर पुढील नियोजन करण्यासाठी पक्षप्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे पक्षाच्या दिग्गजांची बैठक बोलावली आहे.
शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली
महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेची सध्याची सर्वात मोठी कसरत सरकार वाचवण्याची नसून पक्ष वाचवण्याची आहे. त्यामुळे त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या राजकीय युद्धात सरकारचे सारथी होताना दिसत आहेत. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक
सध्या महाराष्ट्रात राजकीय भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेने आज दुपारी 1 वाजता मुंबईतील सेना भवनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. गेल्या 6 दिवसांपासून महाराष्ट्रात जे वातावरण तापले आहे त्यात शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होऊ शकते
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व नेते, उपनेते, संपर्क अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राजकारणासोबतच शिवसेना आणि मुख्यमंत्रीपदाचा महत्त्वाचा निर्णय यावर चर्चा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.