Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांचे दु:खद निधन झाले...

१३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांचे दु:खद निधन झाले...


१३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांचे दु:खद निधन झाले... त्या आगोदरच्या वर्षी म्हणजे १३ ऑगस्ट १९६८ ला साहेबांच्या ७० व्या वाढिदवसाला साहेबांनी जवळ बसवून हा फोटा काढून घेतला... गेली ५३ वर्षे हा फोटो हृदयावर कोरून ठेवला आहे.


आदरणीय अत्रेसाहेब,

आज तुमची ५३ वी पुण्यतिथी.... तुम्ही मला संधी दिल्यामुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले. अशा कितीतरी जणांना तुमच्यामुळे आयुष्यभराचे समाधान मिळाले. तुमचा स्पर्श परिसस्पर्श होता. तुमच्या किती सभा करता आल्या.... तुमच्या सोबत किती प्रवास करता आला... नागपूरची दहा वर्षांची विधनसभेची अधिवेशने... आणि त्याहीपेक्षा २४ जानेवारी १९६३ ला तुमच्या शेजारी विमानात बसून तुम्ही मला गोव्याच्या सभेला घेवून गेलात... लाखा - लाखांची ती सभा आज जशीच्या तशी डोळ्यासमोर आहे. तुम्ही महाराष्ट्राला हसवलेत..., रडवलेत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढवलेत... तुमच्या प्रखर लेखणीने आणि तोफगोळ्यांसारख्या शब्दांनी, गाजलेल्या प्रत्येक सभेमुळे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यात अन्य नेत्यांचेही मोठे श्रेय आहे... हे कोणालाही नाकारता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्राचा हा कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. 'संयुक्त महाराष्ट्राचे राज्य दिले नाही तर महाराष्ट्रात काँग्रेसचा टिकाव लागणार नाही', हे यशवंतरावांनी पंडित नेहरूंना पटवून दिले हे खरे... आणि हे 'निभाव न लागणारे वातावरण' संतप्त मराठी माणसांनी निर्माण केले आणि त्या मराठी माणसाला संतप्त करण्याचे काम तुमच्या लेखणी आणि वाणीने केले. 

हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नाईलाजाने दिल्यानंतर या राज्याचे नाव 'मुंबई राज्य' असेच ठरले होते. तुम्ही लेखणीची तलवार करून पहिल्या पानावर अग्रलेख लिहिलात... त्याचे शिर्षक होते.... 'याद राखा... आमचे नाव महाराष्ट्रच...' मग यशवंतराव म्हणाले की, 'आम्ही कसांत महाराष्ट्र शब्द टाकणार आहोत.' मुंबई राज्य (महाराष्ट्र) हा खुलासा होताच तुम्ही पुन्हा कडाडलात... 'या कंसाचे आम्ही पोट फाडू'.... 'आईच्या पोटात मुलगी की मुलीच्या पोटात आई .... महाराष्ट्र आमची आई आहे.... 'कंस' चालणार नाही. आणि अवघ्या ७२ तासांत या राज्याचे नाव 'महाराष्ट्र राज्य' झाले. शेवटपर्यंत तुम्ही लढत होतात. राज्य मिळवेपर्यंत आणि राज्याला महाराष्ट्र नाव मिळेपर्यंत...

आज ५३ व्या पुण्यतिथीला हे सगळे आठवते आहे. डोळ्यासमोरून सरकते आहे... तुमच्या सोबतची ती १०-१२ वर्षे आयुष्यात विसरता येणार नाहीत. 'प्रितीसंगम' नाटक तुम्ही लिहीलेत. त्यामधला 'देह देवांचे मंदिर... त्यात आत्मा परमेश्वर....' हा अभंग तुकोबांना शोभेल अशा थाटात आपण लिहिलात.... शेवटच्या ओळीमध्ये तुम्ही तुमच्या नावाऐवजी 'तुका सांगे मूढ जना... देही देव का पाहाना....' या ठिकाणी तुम्ही तुकोबांचे नाव घातलेत... तुमच्या उशाला नेहमी तुकोबांची गाथा होती. आणि 'मराठा'त अग्रलेखांच्या शिर्षकाच्या वर तुकोबांचाच अभंग होता...

आज हे सगळे आठवते आहे. तुमची ती अंत्ययात्रा... लाखो लोकांचे रडणे... ते उमाळे... ते उसासे... महाराष्ट्र पोरका झाल्याची जाणीव... आज तर तुमची खूप गरज होती. तुमची... तुमच्या लेखणीची... तुमच्या पत्रकारितेची. आजच्या या उथळ राजकारणात 'तुम्ही नाहीत' हे सतत जाणवत आहे. आयुष्यभर जाणवेल...

१३ ऑगस्ट १९६८ रोजी तुमचा ७० वा वाढदिवस 'शिवशक्ती' मध्ये किती उत्साहाने साजरा झाला होता... त्याच्या आदल्या दिवशी शिरीषताई तुम्हाला म्हणाल्या... 'पप्पा, उद्याचा अग्रलेख ७० बेहत्तर...' असा असेल. तुम्ही अगदी हळूवार म्हणालात... नाने, ७० वर्षे जगून बघ... ढ़. आणि दुसऱ्या दिवशीचा अग्रलेख मराठात झळकला... 'ही ईश्वराची दया...' तो अग्रलेख वाचताना शिरीषताईंच्या डोळ्यांतून पाणी ओघळले... संपादकीय वर्गातील प्रत्येकाला तो उत्साहाचा दिवस असतानाही त्या अग्रलेखाने हुरहूर लावली. माझे भाग्य असे की... त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला हाक मारून शेजारी बसवलेत... छायाचित्रकार दत्तू आंबेरकर यांना हाक मारून सांगितलेत... 'आमचा फोटो काढ....' साहेब, तो फोटो आज ५३ व्या वर्षी केवळ जपून ठेवला नाही तर हृदयात कोरून ठेवला आहे... असे दिवस पुन्हा कसे येणार... तुमच्या पायावर माझी अनंत लोटांगणे....

तुम्ही मला 'मराठा'त घेतले नसते तर आज आयुष्य कुठल्या कुठे फेकले गेले असते. तुमच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला कोणत्याही भाषेत शब्दच नाहीत.... पण शब्दाविनाही शब्दापलिकडची भावना तुम्हाला स्वर्गातही समजू शकेल...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.