Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप

 नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप


ठाणे: एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडलेले पाहायला मिळत असताना, दुसरीकडे आता ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे.

तसे पत्र म्हस्के यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. शनिवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी नरेश म्हस्केही सहभागी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंडाचे हत्यार उपसले आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ ठाणे किंवा जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रातही काम केले. त्यामुळेच त्यांना या आमदारांचा पाठिंबा लाभला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना साथ दिली आहे. तसेच इतर अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेची गळचेपी झालेली आहे, त्यामुळे आघाडीतून बाहेर पडले पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...!

नरेश म्हस्के यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तसेच उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा.. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आहोत

तसेच आम्ही गेली अनेक वर्ष एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तिप्रदर्शनावेळी शिवसेनेचे सर्व ६७ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. आमच्या सर्व शिवसैनिकांचे एकच म्हणणे आहे की, आजही आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आहोत. हिंदुत्वाच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे यांनी जी हाक दिली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. मी शिवसैनिक आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तसेच सुमारे महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांना या सर्व परिस्थिती सांगितलेली आहे. आता पुन्हा भेटून बोलण्यात काही अर्थ नाही. माझ्या राजीनाम्याची प्रत पाठवून देत असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.