Breaking News

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात पुरला मृतदेह

 सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात पुरला मृतदेह


कराड : वहागाव (ता. कराड) येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केला. तसेच शेतात जेसीबीने पंधरा फुट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कार्यवाही सुरू होती. बरकत पटेल (वय 30, रा. वहागाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वहागाव येथील बरकत पटेल हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत बरकतच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

बरकतच्या पत्नीचे गावातीलच एका युवकाशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद घालत होता. पती आपल्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकराने सुमारे चार दिवसांपूर्वी बरकतचा खून केला.


तत्पूर्वी संबंधित युवकाने आपल्या शेतात भाडेतत्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्ड्यामध्ये पाण्याची टाकी बांधायची आहे, असे त्याने जेसीबीच्या आँपरेटरला सांगितले होते. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करुन त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला. तसेच थोडीफार माती ओढून तो खड्डा मुजविला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी बोलावून पाण्याची टाकी बांधण्याचे काम रद्द झाले असल्याचे सांगून त्या युवकाने खड्डा पुर्णपणे मुजवून घेतला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. रात्री उशिरा तहसिलदारांसमोर संबंधित खड्डा खोदून त्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.