मधुकर भावे - काळोखातील राजकारण किती टिकेल?
आजच ती झालेली आहे. शिवसेनेची मतं फुटतात, काँग्रेसची मतं फुटतात... भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येण्यासाठी लागणारं एकही मत त्यांच्याजवळ नसताना, त्यांचा पाचवा उमेदवार निवडून येतो... ३०-३५ मतं फुटतात.... या सगळ्याचा अर्थ असा आहे की, ३० नोव्हेंबर २०१९ या िदवशी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांनी जो ‘विश्वास ठराव’ मांडला होता... त्या विश्वास ठरावावर मतदान होवून १६९ विरुद्ध शून्य मतांनी तो मंजूर झाला. भाजापाने सभात्याग केला. त्या दिवशी तुमच्या मागे जे अपक्ष आमदार होते ते तर फुटलेच.... शिवाय शिवसेनेचे आमदारही फुटले. हे असं का झालं? याचा विचार करायची वेळ आता िनघून गेली. पण दोन-तीन गोष्टी स्पष्ट सांिगतल्या पाहिजेत...
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, संजय राऊत यांच्याबद्दल शिवसैिनकांत असलेला असंतोष समजावून घ्या... काही मंत्र्यांनाही विचारा.... खरं बोलतील की नाही, मािहती नाही... पण, खाजगीत काय बोलतात त्याची माहिती घ्या. त्यांन्ाा चौथ्यांदा खासदार करण्याची काही गरज नव्हती. १८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्रसाठी राज्यसभेत काय काम केले? आपले व्यक्तिमत्त्व देशपातळीवर निर्माण करण्यासाठी ममता बॅनर्जींची भेट घे, राहुल गांधी यांची भेट घे... त्यांच्यासोबतचे फोटो ‘सामना’मध्ये छाप... हे ज्यावेळी घडत होते त्यावेळी तुम्ही पक्षप्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून हे सर्व थांबवायला पाहिजे होते. ज्या सामान्य शिवसैनिकाला तुम्ही खासदार करू इचि्छत होतात, ती तुमची भावना अतिशय योग्य होती... पण, मग त्या संजय पवार यांना निवडून आणण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यासाठी या संजय राऊत यांना बाजूला ठेवणेच शिवसेनेच्या फायद्याचे झाले असते. आज ही वेळच आली नसती. शिवसैनिकांत किती वाईट संदेश गेला, याची तुम्हाला कल्पना नाही. परवा जालना येथे होतो... कोण, काय बोलतेय, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. आपल्याला पत्र लिहिल्यानंतर ते वाचून दिवसभर १०० च्या वरती फोन आले. त्या प्रत्येकाची भावना हीच होती... आिण अजूनही तीच भावना आहे. महाभारतातही संजय होता... आिण धृतराष्ट्राने डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आताची राजकीय स्थिती तशीच आहे.... हे सगळे घडले याचे कारण तुम्ही लोकांपासून खूप दूर राहिलात.... कोरोनाचे पहिले कारण योग्य होते.... पण कोरोना संपल्यावर तुम्ही हे सगळं समजावून घेतले असते तर, आज ही वेळ आली नसती. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही... बोलणारही नाही... तेवढी हिम्मतही करणार नाहीत. पण, जे घडले ते राजकीय दूरदृष्टीच्या अभावातून घडले. विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशीच तुम्ही दिवसभर विधानभवनात बसून असताना, फुटणाऱ्या आमदारांचा पत्ता कोणालाच लागला नाही. हे सगळे आक्रित घडताना जो राजकीय चाणाक्षपणा लागतो, सगळ्याच आघाडीवर महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला त्याचा थांगपत्ता लागला नाही. िनवडणुकीच्या सगळ्यांच आघाड्यांवर महाविकास आघाडी कच्ची राहिली.
विधानपरिषद निवडणूक निकाल प्रसिद्ध होईपर्यंत अाणखी एक बाँम्ब पडला... एकनाथ िशंदे गायब झाल्याच्या बातम्या आल्या. ३० वर्षांपूर्वीची आठवण झाली.... १० डिसेंबर १९९१ रोजी छगन भुजबळ असेच गायब होवून शिवसेनेपासून दूर झाले होते. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे १७ आमदार होते. त्यातील ५ आमदार पुन्हा परत आले. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. नंतर भुजबळ काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांना कडेकोट संरक्षण होते. १ मे १९९८ ला गणेश नाईक यांना शिवसेनेचे मंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांनी दूर केले होते.
आता जे काही घडले आहे त्याचे परिणाम पुढे काय होतील, ते काळ ठरवील. पण एकनाथ िशंदे का नाराज आहेत.... एका दिवसात नाराज झाले का?.... काही कारणं घडली असतील. एवढ्या जेष्ठ नेत्याला डावलले गेले का? काही चुकीची कामे त्यांना सांगितली का?, याचा एकदा िवचार करा.... आदित्य ठाकरे आयोध्येला रामाचे दर्शन घ्यायला जाणार, यासाठी आगोदर तयारीला संजय राऊत जाणे समजू शकतो... पण त्यांच्यासोबत एकनाथ िशंदे.... तुम्हाला ही कारणे कोणीच सांगणार नाहीत. कदाचित मान्यही होणार नाहीत. कारण कोणत्याही पित्याला आपल्या पुत्राबद्दल प्रेम असणारच... पण, तिथंही तुम्ही काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्या होतात. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आदित्यला न घेता पाच वर्षे ‘प्रतोद’ किंवा जास्तीत जास्त संसदीय कामकाजमंत्री करून, विधानसभेचा अनुभव घ्ोवू द्यायला हवा होता.
श्री. शरद पवार १९६७ साली विधानसभेत निवडून आले. यशवंतराव चव्हाण िदल्लीत केंद्रीय मंत्री होते. शरद पवार त्यांचे मानसपुत्र. पण त्यांनी वसंतराव नाईक यांना स्पष्ट सांिगतले की, ‘शरदला राज्यमंत्री, मंत्री करू नका.... आधी विधानमंडळाच्या कामकाजाचा अनुभव घेवू द्या...’ श्री. शरद पवार १९७२ साली दुसऱ्यांदा निवडून आल्यावर मग राज्यमंत्री झाले. सुरुवातीला गृह आिण प्रसिद्धी खात्याचे राज्यमंत्री होते. नंतर कॅबीनेट मंत्री झाले. वसंतदादा पाटील १९५२ साली आमदार झाले... आिण १९७२ साली मंत्री झाले. तुम्ही थोडी घाई केलीत... आिदत्य ठाकरे यांच्याजवळ भरपूर वय आहे. विधानमंडळातील अनुभव घेवून पुढच्यावेळी त्यांना संधी िमळाली तर घ्यायला हवं... पण आपण ताबडतोब त्यांना मंत्री करून, ‘प्रोटोकॉलसारखं खातं’ िदलं... हे खातं जेष्ठ मंत्र्याला िदलं जातं.... िशवाय िजकडं-तिकडं त्यांच्या जाहिराती ज्या लागतात... त्यात ‘आदित्य ‘साहेब’ ठाकरे....’ असा उल्लेख असतो... ‘साहेब’ फक्त बाळासाहेबच... आिण घटनाकार डॉ. बाबासाहेब.... आदित्य यांना ‘साहेब’ व्हायला अजून वेळ आहे. हे माझे निरिक्षण नाही. एका शिवसैनिकाने ही गोष्ट सांिगतली आहे... किती बारिक गोष्टीचा सामान्य माणूस विचार करतो बघा... असंतोषाला या सगळ्या बारिक-बारिक गोष्टी कारणीभूत असतात. तुमचा संपर्क कमी झालेला आहे. मित्रांशी तर अिजबात नाही... तुमच्याबद्दलच्या सहानुभूतीने लिहिलेले तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही, कोणास ठावूक...?
एक उदाहरण सांगतो..., ‘महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले... त्यावेळचे महाराष्ट्रातील थोर पत्रकार, नागपूर ‘तरुण भारत’चे संपादक कादंबरीकार गं. त्र्यं. माडखोलकर यांनी अग्रलेख लिहिला.... शिर्षक होतं... ‘हे राज्य मराठा की, मराठी?...’ त्यावेळी आजच्यासारखी प्रसारमाध्यमे नव्हती... सोशलमीिडयाही नव्हता. श्री. शंकरराव गेडाम यांनी यशवंतरावांना फोनवर अग्रलेख वाचून दाखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता कसलाही अिधकृत कार्यक्रम जाहीर न करता, डकोटा विमान घेवून यशवंतराव थेट नागपूरला गेले.... आिण भाऊसाहेब माडखोलकरांच्या दारात उभे राहिले.... भाऊसाहेब दाढी करत होते... यशवंतरावांना बघून चाट पडले... का येणं केलं? या, या... त्यांचे स्वागत केलं... यशवंतरावांनी अग्रलेखाचं कारण सांिगतलं... यशवंतराव म्हणाले की, ‘भाऊसाहेब, मी राज्यावर असेपर्यंत हे होऊ देणार नाही... तुम्ही नि:श्चिंत रहा....’ राज्य करणारा नेता एवढा संवेदनशील असावा लागतो, हे यशवंतरावांनी दाखवून िदले.
गेल्या लेखातही मी म्हटले होते की, काहीतरी बिघडलंय.... काही तरी चुकलंय.... काँग्रेसबद्दलही याच जागेवर चार महिन्यांपूर्वी लिहले होते की, आघाडीच्या सरकारला बाहेरून पािठंबा द्या... आिण रस्त्यावर उतरा... लोकांसोबत रहा.... आज काँग्रेसवर काय वेळ आली.... प्रथम पसंतीचा उमेदवार पडतो, त्याचं कोणाला दु:खही नाही....
एकूणच राजकीय परिसि्थती अतिशय विचित्र आहे. राज्य असि्थर आहे. उद्या काय होईल, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांची काय भूमिका राहील, त्यांच्यासोबत किती आमदार राहतील... किती फुटतील.... आज कहीच सांगता येणार नाही. पण एकेकाळचा पुरोगमी मजबूत महाराष्ट्र आज भलत्या वाटेवर चाललेला आहे. एवढं मात्र नक्की... आघाडी असो किंवा भाजपा असो, आजचं िचत्र असं आहे की, कुठे नेवून ठेवणार आहात यशवंतरावांचा पुरोगामी महाराष्ट्र.... ? याचं उत्तर कोणालाच देता येणार नाही.
घटनात्मक विचार केला तर, जे फडणवीस यांच्या बाबतीत घडले तेच घडेल. उद्धवसाहेब यांना ‘विधानसभेत आमचे बहुमत आहे’, हे राज्यपालांना सांगावे लागेल.... राज्यपालांना विधानसेभेचे अिधवेशन बोलवावे लागेल. त्या अिधवेशनात बहुमताचा ठराव उद्धव सरकारला मंजूर करून घ्यावा लागेल. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली तेव्हा काँग्रेस पक्ष हायकोर्टात गेला. कोर्टाच्या आदेशाने बहुमतासाठी अिधवेशन बोलवावे लागले. पण त्यापूर्वीच फडवीसांनी राजीनामा िदला.
यावेळच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके िकती आमदार आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही राजकीय पक्षातून आमदारांना फुटायचे असेल तर एकूण संख्येच्या १/३ संख्येने फुटता येईल. तरच त्या पक्ष बदलाला ‘वेगळा गट’ म्हणून विधानसभा अध्यक्ष मान्यता देवू शकतील. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आिण अपक्ष असे नेमके िकती आमदार आहेत? हे जिथपर्यंत स्पष्ट होत नाही, तिथपर्यंत महाराष्ट्रात राजकीय अस्िथरता कायम राहील. समजा, पुरेसे आमदार त्यांच्यासोबत नसतील तर, काँग्रेस आिण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आता काय राहणार आहे, हे ही महत्त्वाचे आहे. एकूणच महाविकास आघाडीच्या सध्याच्या त्रिपक्षीय सरकारात बहुमताएवढे आमदार पुन्हा सिद्ध करावे लागतील. अपक्ष आमदार नेमके कोणाबरोबर जाणार? हे ही अधांतरीच आहे... ज्या अर्थी एकनाथ शिंदे गुजरातमधील हॉटेलमध्ये जावून राहिले आहेत, त्या अर्थी सोमवारच्या रात्री िकंवा मंगळवारच्या पहाटे दिल्लीशी चर्चा होवून हे सर्व ठरले असणार... जशी फडणवीसांनी पहाटे शपथ घेतली, तसे हे काळोखातील राजकारण आहे. ते िकती िटकेल, की फसेल? हे आज सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणाचे धिंधवडे िनघालेत. स्थिर सरकार, मजबूत सरकार जिथपर्यंत मतदार निवडून देत नाहीत, तिथपर्यंत राजकारणाचा चुथडा होणार, हे आता स्पष्ट आहे. सामान्य माणसाला त्यामुळेच राजकारणाची किळस आली आहे.
- मधुकर भावे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.