बंडखोरांची मंत्रीपदे 24 तासांत जाणार
हिंदुत्व आणि निधीवाटपाच्या मुद्यावरून बंडखोरी करणाऱया आमदारांचे हिंदुत्व सपशेल खोटे-बहाणेबाज असून शिवसेनेचेच हिंदुत्व खरे आहे. बंडखोरी करणाऱ्या तब्बल 16 आमदारांना 'ईडी'च्या कारवाईची भीती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी फक्त तोंडी लावायच्या आहेत असे सांगतानाच, बंडखोर आमदार लालसा, महत्त्वाकांक्षा आणि आमिषामुळेच पळाले असल्याचा घणाघात शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी आज केला.
भाजपने बेइनामी केली नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. तेव्हा भाजपलाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. 2019 ला भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले असते, असे प्रतिपादनही राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना केले. तीन पक्ष एकत्र आल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कोरोनासारख्या भयंकर संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि पक्षाची दुहेरी जबाबदारी सांभाळली. ते आमदारांशी संवाद साधत नाहीत असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिघेंच्या नावाने राजकारण करू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करेलच!
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेने मेहनतीने मोठे केले. त्यामुळे जनता या बंडखोर आमदारांना पुन्हा मत देणार नाही. ज्या आमदारांविरोधात किरीट सोमय्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेतल्या त्या आमदारांवरील केसेस भाजपने 24 तासांत क्लिअर केल्या असेही राऊत यांनी सांगितले. कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करेल, असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. राजकारण ही पवारांची ऊर्जा आहे. त्यामुळे ते आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंची वेळ निघून गेली
शिवसेना हा एक ब्रँड आहे. त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणार आहे. याआधीही अनेकांनी बंड केले. शिवसेनेला या बंडांची सवय आहे आणि अशा बंडांशी लढून जिंकण्याचीही सवय आहे. आजवर शिवसेनेच्या पाठीवर अनेक वार झाले आहेत; मात्र बाळासाहेबांनी अशा गद्दारांना कधी माफ केले नाही. एकनाथ शिंदेंना शिवसेनेने अनेक संधी दिल्या, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता वेळ निघून गेली आहे. आता पक्षप्रमुखच निर्णय घेतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.