Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड वर्षात 10 लाख जणांना नोकरी देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

 दीड वर्षात 10 लाख जणांना नोकरी देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा


नवी दिल्ली : येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख जणांना रोजगार दिला जाणार आहे. तसे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत. वेगवेगळ्या मंत्रालयांना आणि विभागांना संबंधित विभागांमध्ये पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दीड वर्षामध्ये दहा लाख लोकांची पदभरती करण्याचं ध्येय केंद्र सरकारकडून ठेवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्यांच्या संख्याबळाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्वच खात्यातील मंत्रालयांना आणि विभागांना पदभरती करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. पीएमओ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारमधील नोकरभरती कधी सुरु होणार, याकडे बेरोजगारांचे आणि इच्छुकांचे डोळे लागले होते. अखेर आता लवकरच पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय.

नोकरीचं मिशन मोड…

मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि त्यासोबत निर्णयही जाहीर होण्याची शक्यता आहे. नोकरभरतीसाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. नोकरीचं मिशन मोड राबवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पावलं उचलण्याची शक्यता आहे.

2 वर्षांपासून पदभरती रखडली

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात पदभरती करण्यात आलेली नव्हती. हजारो रिक्त पदं केंद्र सरकारमध्ये असून ही पदभरती केव्हा केली जाणार, असा सवालही उपस्थित केला जात होता. अखेर दिलासादायक निर्णय आता केंद्र घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत पीएमओनं दिलेत.

मोदी सरकारमध्ये बेरोजगारी हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. कोरोना काळातही अनेकांनी नोकऱ्या गमावल्या होत्या. दरम्यान, आता रोजगाराच्या प्रश्नावर मोदी सरकार महत्त्वपूर्ण काम करण्याच्या तयारीत असून येत्या दीड वर्षात ही पदभरती होणार आहे. पीएमओकडून करण्यात आलेल्या या घोषणेनं अनेकांच्या जीवात जीव आला आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलेल्यांसाठी येत्या काही दिवसांतच सुवर्णसंधी निर्माण होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.