इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल, राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का होत नाही?
औरंगाबाद: १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
माझ्या मनात एक शंका येते, माझा भाऊ आहे, म्हणून मी त्यावर कशाला देशद्रोहाची कलमे लावू. मी नवनीत राणावर देशद्रोहाची कलमे लावू शकतो, मी दुसऱ्यांवर लावू शकतो, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का, ज्या कलामांतर्गत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे, तीच कलमे राज ठाकरे यांच्यावर लावावीत, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.